Bipin Rawat : बिपीन रावत यांना शिवाजी महाराजांबद्दल नितांत अभिमान; 2018 सालच्या दिल्लीतील शिवजयंतीला उपस्थिती
Bipin Rawat : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेल्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी 2018 साली दिल्लीत साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीला खास उपस्थिती लावली होती.
मुंबई : तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाच्या पहिल्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे देशावर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांना छत्रपती शिवराय आणि ताराराणी महाराणीसाहेबांच्याबद्दल नितांत अभिमान होता. दिल्लीमध्ये 2018 साली साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली होती.
राज्यात शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. ती दिल्लीतही साजरी करण्यात यावी अशी अनेक शिवप्रेमींनी इच्छा व्यक्त केली. त्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन 2018 साली पहिल्यांदा दिल्लीत शिवजयंती साजरी केली. या शिवजयंतीला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि जनरल बिपीन रावत यांनी उपस्थिती लावली.
छत्रपती घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते असं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले, हे मनाला अजूनही पटत नाही अशा त्यांनी भावना व्यक्त केल्या.
खासदार संभाजीराजे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्याबद्दल बोलतांना म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते, तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता. दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसाहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती."
The Chief of Defense Staff Hon’ble Shri Bipin Rawat and his wife Madhulika Ji, had a very close bond with the Chhatrapati Family. I still can’t accept this loss.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 8, 2021
We have lost a great military general who in his own words was a student of Chhatrapati Shivaji Maharaj. pic.twitter.com/v0nn80t2gd
सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी कोल्हापूर येथे लष्कराच्या कार्यक्रमास उपस्थित असताना मोठ्या आपुलकीने नवीन राजवाड्यास भेट देऊन छत्रपती घराण्याचा पाहुणचार स्वीकारला होता.
संबंधित बातम्या :
- Bipin Rawat Helicopter Crash : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
- Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!
- Bipin Rawat : शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला...पण देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया