Bharat Jodo Yatra: ठरलं! भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे 'हे' दिग्गज नेते होणार सहभागी, शरद पवारांच्या उपस्थितीबाबत साशंकता
Bharat Jodo Yatra: महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणते प्रमुख नेते या यात्रेमध्ये सामील होणार या चर्चेला उधाण आले आहे.
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली असून नांदेडमधून या यात्रेचा प्रवास सुरु आहे.. मात्र या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सहभागाविषयी साशंकता आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीकडून दिग्गजांची फळी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार 10 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची नांदेडमधून सुरुवात झाली आहे. पदयात्रा वनरगा येथे पोहचली आहे. पदयात्रेत हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभागी झाले आहेत. कॉंग्रेससोडून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणते प्रमुख नेते या यात्रेमध्ये सामील होणार या चर्चेला उधाण आले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीकडून 10 नोव्हेंबरला जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सहभागी होणारं आहेत. तर राजेश टोपे आणि राजेंद्र शिंगणे भारत जोडो यात्रा बुलढाणा येथे आल्यानंतर आपला सहभाग नोंदवणार आहे. आमदार रोहित पवार देखील हिंगोली येथ राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न्युमोनिया झाल्यामुळे छातीत मोठया प्रमाणत संसर्ग झाला आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिराला सहभागी झाले होते. मात्र चेहऱ्यावर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. शिबिरात देखील पवार यांनी फक्त पाच मिनिटं कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. सध्या पवार यांची तब्येत पाहता ते रॅलीत सहभागी होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. पवार जरी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसले तरी राष्ट्रवादीकडून दिग्गजांची फळी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे.
ठाकरे कुटुंबीय देखील भारत जोडो यामध्ये सहभागी होणार आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेसाठी जाण्यासाठी उत्सुक देखील आहेत. त्या दृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे. सभा आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे यांच्या सहभागाबाबत साशंकता आहे.
राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत.