बेळगावात रायबागच्या तहसीलदारांना मध्यरात्री सामानासह घराबाहेर काढले
रायबागचे तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांना त्यांच्या निवासस्थानातून सामानासह मध्यरात्री बाहेर काढल्याची घटना घडली आहे. आमदार दुर्योधन ऐहोळे यांंच्या सांगण्यावरुन आपल्याला घराबाहेर काढल्याचा आरोप तहसीलदारांनी केला आहे.
बेळगाव : रायबाग तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांना त्यांच्या निवासस्थानातून सामानासह मध्यरात्री बाहेर काढण्यात आल्याची घटना घडली आहे. आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्या सांगण्यावरुनच आपल्याला मध्यरात्री घराबाहेर काढल्याचा आरोप तहसीलदारांनी केला आहे.
रायबागचे तहसीलदार चंद्रकांत बजंत्री आणि आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंकणवाडी गावातील जमीन वादातून आमदार आणि तहसीलदार यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. आमदारांच्या दबावाखाली कोणतेही काम करणार नसल्याची भूमिका तहसीलदारांनी घेतली होती. त्यामुळे आमदारांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियूरप्पा यांना पत्र लिहून तहसीलदारांची बदली केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हा बदलीचा आदेश नियमाला धरुन नाही, आपली बदली नियमबाह्य पद्धतीने झाली आहे असे सांगून तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांनी कर्नाटक अॅपेलाईट ट्रिब्युनलकडे दाद मागितली आहे.
तरंच मध्यरात्री घराबाहेर काढण्यास आमदारच जबाबदार असल्याचा आरोप तहसीलदारांनी केला आहे. निवासस्थान रिकामे करण्याचा आदेश आमदारांचाच आहे, असं अनेक अधिकाऱ्यांनी सांगितल्याचेही तहसीलदारांनी म्हटले आहे. मात्र आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तहसीलदारांना मध्यरात्री घराबाहेर काढण्याच्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याची प्रतिक्रिया दुर्योधन ऐहोळे यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे तहसीलदार चंद्रकांत बजंत्री यांनी दुसरे निवास्थान देखील बघितले होते. पण आमदारांनी तेथेही आपला दबाव वापरुन घरमालकाला तहसीलदारांना घर द्यायचे नाही असे सांगितल्यामुळे चंद्रकांत बजंत्री घराबाहेरच सामान घेऊन बसून हो ते.