नागपुरात मेडिकलमध्ये दारुविक्री; तर बारामतीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक
दारुड्यांची 'तहान' भागवण्यासाठी मेडिकल शॉपमध्ये दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. तर बारामतीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्यांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
रजत वशिष्ठ, नागपूर/राहुल ढवळे, बारामती : कोरोना विरोधात लढा देताना लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांसाठी मेडिकल स्टोर्सची आवश्यकता सर्वात जास्त आहे. लोकांची हीच गरज लक्षात घेऊन शासनाने मेडिकल स्टोर्स सुरु ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, काही लोकं याचा ही गैरफायदा घेत आहेत. नागपुरात एका मेडिकल स्टोर्समधून चक्क दारूची विक्री होत असल्याचे समोर आलं आहे.
मेयो रुग्णालयासमोर कांचन मेडिकल स्टोर्समध्ये नियमबाह्य पद्धतीने बियर आणि इतर मद्य विक्री सुरु असल्याची माहिती गणेशपेठ पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी घातलेल्या छाप्यात बिसलरी/मिनरल वॉटरच्या बॉक्सेसमध्ये छुप्या पद्धतीने बडवायजर, ट्युबर्ग, किंगफिशर या ब्रँडच्या बियरची विक्री सुरु असल्याचं उघड झालं. पोलिसांनी दुकानातून 90 बॉटल्स जप्त करत मेडिकल स्टोर्सचा संचालक निशांत गुप्ता याला अटक केली आहे.
या मेडिकल स्टोर्सच्या संचालकांचा एक नातेवाईक बियर बार चालवतो. त्याच्याकडून बियरच्या बॉटल्स आणून मिनरल वॉटरच्या बॉक्सेसमधून त्याची विक्री सुरु करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी मेडिकल स्टोर्स संचालकाला अटक केली असून अशाच पद्धतीने इतर ही मेडिकल स्टोर्समधून मद्य विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे का याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
बारामतीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा विक्री
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील काही भागात पोलिस पेट्रोलिंग करत असताना रस्त्याने जाणाऱ्या टेम्पोच्या हालचालीबाबत संशय आल्याने त्याची तपासणी पोलिसांनी केली.. त्यावेळी या टेम्पोमध्ये 22.27 लाखांचा गुटखा आढळून आला.. हे वाहन तेलंगणा येथून 540 किलोमीटरचा प्रवास करून मुंबईकडे निघाले होते. आरोपींनी सदर वाहनाचा शासनाकडून ऑनलाईन पाससुद्धा प्राप्त करून घेतला आहे. बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.