बीड ते वडवणी मार्गावर पहिली रेल्वे इंजिन चाचणी यशस्वी; 10 आणि 11 डिसेंबरला होणार स्पीड रेल्वे चाचणी
Beed : आज बीड ते वडवणी मार्गावर पहिली रेल्वे इंजिन चाचणी यशस्वी झाली. 10 आणि 11 डिसेंबरला स्पीड रेल्वे चाचणी होणार आहे.
Beed : आज बीड ते वडवणी या रेल्वे लोहमार्गावर पहिली इंजन चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता 10 आणि 11 डिसेंबर रोजी सीआरएस तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचणी केली जाणार आहे. पहिल्यांदाच या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावल्याने हा क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वडवणीसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
बीड पासून वडवणी हे 30 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले
बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर रेल्वे धावल्यानंतर आता बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. बीड पासून वडवणी हे 30 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून रेल्वे विभागाकडून या मार्गावर चाचण्या केल्या जात आहेत. या मार्गावर कालच रेल्वे इंजिन चाचणी केली जाणार होती. मात्र काही तांत्रिक बाबीमुळे इंजिन चाचणी होऊ शकली नाही. मात्र आज या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावले.
या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होणार
या चाचण्यांमध्ये ट्रॅकची गुणवत्ता, उच्च वेग सहन करण्याची क्षमता, ब्रेकिंग सिस्टिम, तांत्रिक सुरक्षितता अशा विविध बाबींची सखोल तपासणी झाली आहे. चाचण्यांचे निकाल समाधानकारक आल्यामुळं पुढील टप्प्यात या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 10 आणि 11 डिसेंबर रोजी सीआरएस तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन चाचणी होत असल्याने स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच रेल्वे ट्रॅक परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. रेल्वे ट्रॅकजवळील गावे, शेतकरी, गुरेढोरे मालक आणि स्थानिक नागरिकांना चाचणीच्या दिवशी दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. अहिल्यानगर–बीड रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता बीड–परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यातील सुमारे 30 किलोमीटरचा बीड ते वडवणी टप्पा चाचणीसाठी सज्ज झाला होता. त्यानंतर आज यावर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळं आता स्पीड रेल्वेची चाचणी घेतल्यानंतर या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:























