Beed: गेल्या तीन वर्षात बीडमध्ये मुलींच्या जन्मदरात घट; PCNDT बैठकीत चिंता व्यक्त
Beed: काही वर्षांपासून मुलींच्या वाढत्या जन्मदराला गेल्या तीन वर्षांपासून पुन्हा एकदा लगाम लागल्याचं दिसून आलं आहे.
बीड: बीडमधील मुलींच्या वाढत्या जन्मदरामध्ये पुन्हा एकदा काही प्रमाणात घट होत असून त्यावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा दहा वर्षांपूर्वी राज्यभर चर्चेत राहिला होता. त्यानंतर एकूण झालेल्या पोलीस कारवाई आणि वैद्यकीय क्षेत्रातील बदलामुळे बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर चांगलाच वाढला. मात्र मागच्या तीन वर्षात पुन्हा एकदा स्त्री जन्मदरात घट होताना पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने घेतलेल्या एका बैठकीतून ही बाब समोर आली.
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका हा राज्यात सर्वात कमी मुलींचा जन्मदर असलेला तालुका म्हणून मागच्या आठ ते दहा वर्षांपूर्वी गणला जायचा. स्त्रीभ्रूणहत्या संबंधी एकूण कारवाई आणि त्यानंतर प्रशासनाने घेतलेली काळजी यामुळे त्या नंतरच्या काळात बीड जिल्ह्यातील स्त्री जन्मदर 810 वरून थेट 961 पर्यंत वाढला होता.
राज्यातील मुलींच्या जन्मदराबाबत मागील तीन वर्षात काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले आहे. सन 2018-19 मध्ये जिल्ह्याचे स्त्री जन्मदराचे प्रमाण सर्वाधिक 961 होते. त्यानंतर सन 2019-20 मध्ये हे प्रमाण 747 इतकं झालं तर 2020-21 मध्ये हे प्रमाण 928 इतके झाले आहे.
तीन तालुक्यात कमी जन्मदर
बीड जिल्हाचा विचार करता तुलनात्मक पाटोदा तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर हा कमी आहे एक हजार मुलांमागे 764 मुली या ठिकाणी जन्मतात. शिरुर तालुक्यात 1 हजार मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर हा 848 आहे. केज तालुक्यात 888 इतके आहे. त्यामुळे पुन्हा आता जिल्ह्यातील स्त्री जन्मदरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..
मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबादसाठी ॲक्शन प्लॅन
मुलीचा जन्मदरामध्ये मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबादसाठी प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेतल्या जात असल्याचे सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले.
पुन्हा एकदा मुलींच्या जन्मासाठी प्रबोधन, जनजागृतीची सुरू करा- पंकजा मुंडे
बीड जिल्हयात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी होत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी च्या सदस्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुलींना नाकारले जात असल्याने जिल्हयात पूर्वीसारखीच स्थिती निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आताच्या कारभारावर कुणाचाही वचक, अंकुश राहिला नाही असे सांगत मुलींचा जन्मदर पुन्हा वाढविण्यासाठी प्रबोधन, जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोविड काळात मुलाचा हव्यास वाढला
कोरोनाच्या मागच्या दोन वर्षाच्या काळामध्ये प्रशासन शासन आणि आरोग्य विभागासमोर वेगळ्या प्रायरोटीज होत्या. त्यामुळेच पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. म्हणूनच येणाऱ्या काळात लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यासाठी ॲक्शन प्लॅन बनवण्यात येत असून प्रचार, प्रसिद्धी, पुरस्कार, शिक्षा अशा वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केलं करणार असल्याचे पीसीपीएनडीटी समितीच्या राज्याच्या अशासकीय सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha