मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणे यांना न्यायालयाची नोटिस; चार आठवड्याची मुदत देत उत्तर देण्याचे आदेश
Bajrang Sonawane : बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
Beed Lok Sabha Election Results 2024 : बीड लोकसभा मतदारसंघाचे (Beed Lok Sabha) शरद पवार यांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी वकील शशिकांत शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असून त्यावर सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले असून खासदार बजरंग सोनवणे यावर आपली नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चार आठवड्याची मुदत देत उत्तर देण्याचे आदेश
बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा लोकसभेत 6 हजार 553 मतांनी पराभव केला होता. दरम्यान, सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यानुसार प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे. यावेळी काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच पोलिंगबुथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सुद्धा निवडणुकीच्या तीन दिवस अगोदर पॉलिंग बूथ केंद्र वाढवले असून त्यामुळे 4 हजार 261 लोक मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. ते बूथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. तसेच सदरील पोलिंग बूथचे मतदान मतमोजणी करताना मोजता येणार नाहीत. असा उल्लेख यावेळी करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून त्यावर खासदार बजरंग सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
बीडच्या हायहोल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव
बीड लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी 6 हजार 555 मतांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा ठरल्याच्या चर्चा झाल्या.
फेरमतदानाची मागणी
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी फेरमतमोजणी मागणी करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या