धक्कादायक! बीडमध्ये भीषण अपघात, दोन अवजड वाहनांनी पेट घेतल्यानं मोठा स्फोट, जीवितहानी झाल्याची माहिती
बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीड जवळील मांजरसुंबा घाटात दोन अवजड वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे.
Beed Accident News : बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीड जवळील मांजरसुंबा घाटात दोन अवजड वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा घाटात हा भीषण अपघात घडला आहे. दोन वाहनांमध्ये अपघात झाल्यानं मोठा स्फोट झाला आहे. त्यामुळं भीषण आग लागली असून सर्वदूर धुराचे लोट पसरले आहेत. जीवित हानी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली असून पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या अपघाताचे आणि आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जीवित हानी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
परभणीत अचानक दुचाकी थांबल्याने विचित्र अपघात, एस टी बसचे मोठे नुकसान
संभाजीनगर कडून वसमतकडे जाणाऱ्या एस टी बस ला परभणीच्या जिंतूरपासून सहा किमी अंतरावर असलेल्या बेलखेडा पाटी जवळ अपघात झाला आहे. एसटी बस समोर असलेल्या धावत्या ट्रक समोर जिंतूरकडे जाणारी मोटार सायकल अचानक थांबल्याने सदरील बस समोर असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली, यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसून एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. मोटार सायकलस्वारास रस्त्या लगतच्या शेतातून अचानक आवाज दिल्याने मोटार सायकलस्वाराने गाडी मध्य रस्त्यात थांबवली असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शिनी दिली आहे, या घटने नंतर मोटार सायकलस्वार पळून गेला आहे.
शिरपूर तालुक्यात तिहेरी मोटारसायकलचा अपघात, पाच ते सहा जण गंभीर जखमी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अर्थे ते वाघाडी दरम्यान रात्रीच्या सुमारास झालेल्या तिहेरी मोटारसायकल अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना तात्काळ उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून रस्त्यावर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंधे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिरपूर उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्यांनी जखमींना भेट देत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. गंभीर जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहादा–शिरपूर रस्त्याची दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, “या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून यामुळे दररोज अपघात होत आहेत. संबंधित विभागाला अनेक वेळा निवेदने दिली, मागणी केली; परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. नागरिकांचा जीव धोक्यात घालून असा रस्ता सोडून देणे हे पूर्णपणे निष्काळजीपणाचे लक्षण आहे.” जर प्रशासनाने तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित केली नाही, तर आम्ही ग्रामस्थांसह मोठे आंदोलन उभारू. आवश्यक असल्यास रास्ता रोको करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला.























