(Source: ECI | ABP NEWS)
Navi Mumbai Kamothe Fire: कामोठ्यात सिलेंडरचा स्फोट, अख्खं घर काळठिक्कर पडलं, रुम नंबर 301 च्या बेडरुममध्ये माय-लेकींचे मृतदेह दिसले
Navi Mumbai Fire Cylinder blast: नवी मुंबईतील इमारतीमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट, आगीचा भडका, दोन जण आतमध्ये अडकले. आतमध्ये जाईपर्यंत मायलेकीचा होरपळून मृत्यू

Navi Mumbai Kamothe Fire: नवी मुंबईतील कामोठे परिसरात मंगळवारी पहाटे एका इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामोठ्यातील (Kamothe News) सेक्टर 36 येथील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत ही घटना घडली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाला (Fire Birgade) वर्दी मिळताच सहा वाजून 8 मिनिटांनी ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यास प्रारंभ केला. या आगीतील इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र, या इमारतीमधील खोली क्रमांक 301 मधील आई आणि मुलीचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या घरातील तीन सदस्य बाहेर निघण्यात यशस्वी ठरले. मात्र, या दोघींना घरातून बाहेर निघता आले नाही. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यानंतर या आई आणि मुलीचा आगीने होरपळलेला मृतदेह बेडरुममध्ये आढळून आला. (Navi Mumbai Fire news)
ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण घर काळेठिक्कर पडले होते. भिंतीवरील संपूर्ण रंग उडून गेला होता. तसेच घरातील एकूण एक वस्तू जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वाजून 8 मिनिटांनी ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना बाहेरून आग लागलेली दिसली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या पत्र्यावर चढून पाण्याचा मारा सुरु केला. खोली क्रमांक 301 मध्ये आग लागली होती. या खोलीतील दोन सिलेंडर्सचा शक्तिशाली स्फोट (Cylinder Blast) झाला. आम्ही आग विझवण्यासाठी आतमध्ये गेलो तेव्हा प्रचंड धूर आणि अंधार होता. आम्हाला खालची जमीनही दिसत नव्हती. आम्ही चौथ्या मजल्यावर पोहोचलो तेव्हा खोली क्रमांक 401 चा दरवाजा लॉक होता. तो दरवाजा उघडून आम्ही आतमध्ये गेलो आणि तिथून तीन-चार जणांना बाहेर काढले. खोली क्रमांक 301 जिथे दोन सिलेंडर्सचा स्फोट झाला होता, तिथे आतमध्ये खूप धूर होता. आम्ही या खोलीतील बेडरुममध्ये गेलो तेव्हा आई आणि मुलगी जखमी अवस्थेत आढळून आल्या. या दोघी प्रचंड होरपळल्या होत्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. ऐन दिवाळसणात घडलेल्या या घटनेमुळे कामोठे परिसरावर शोककळा पसरली आहे. घरातील सिलेंडर्सचा स्फोट कसा झाला, याची नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
आणखी वाचा
ऐन दिवाळीत कामोठ्यात आक्रित घडलं, सिलेंडर्सच्या भीषण स्फोटाने आग लागली, माय-लेकीचा होरपळून मृत्यू
























