बारामतीत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला?, सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर झळकल्याने चर्चा
Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे.
Baramati Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक चर्चेत आलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला असल्याची चर्चा आहे. त्याचं कारण देखील तसेच असून, महाविकास आघाडीचे उमेदवार (Maha Vikas Aghadi Candidate) म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा उल्लेख करत बारामतीत बॅनर (Banner) लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधी सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी उमेदवारीचे स्टेट्स ठेवले होते आणि त्यानंतर आता थेट त्यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याचा अंतिम निर्णय झाला नाही. पुढील काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या उमेदवारीचा स्टेट्स ठेवला होता. असे असतानाच आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे. ज्याच्यावर 'उमेदवारचे नाव सुप्रिया सुळे आणि निशाणी तुतारी फुकंणारा माणूस' असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच याच बॅनरवर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो देखील आहे.
सुनेत्रा पवारांचे देखील दौरे वाढले....
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची महायुतीकडून बारामती लोकसभेकरिता उमेदवारी जवळपास निश्चित झालीय. सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला असून, काल संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त त्यांनी शहरातील अशोकनगर मंदिरात येऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तर, सुनेत्रा पवार यांनी विधिवत पूजा केली असून, मंदिरातच सर्वांसमवेत महाप्रसादाचा आस्वादही घेतला. शिवाय मंदिरात आलेल्या भाविकांना सुनेत्रा पवार यांनी महाप्रसादाचे वाटपही केले आहे. सुनेत्रा पवार यांच्या आधी खासदार सुप्रिया सुळे त्याठिकाणी आल्या होत्या. सुळे यांनी आरतीला हजेरी लावली आणि त्याचवेळी सुनेत्रा पवार देखील आरतीला हजेरी लावणार होत्या. पण त्यांना येण्यास काहीसा उशीर झाला.
इतर महत्वाच्या बातम्या :