शालेय पोषण अन् मंदिरातही वाईन ठेवा; बंडातात्या कराडकर यांनी सरकारला सुनावलं
Bandyatatya Karadkar : आता शालेय पोषण आहार आणि मंदिरात देखील वाईन ठेवावी, असा टोला बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारला लगावला.
Bandyatatya Karadkar : वाईन विक्री निर्णयावर वारकरी संप्रदायाचे जेष्ठ संत बंडातात्या कराडकर यांनी महाराष्ट्र सरकारला उपरोधिक टोले लगावले आहे. आता शालेय पोषण आहार आणि मंदिरात देखील वाईन ठेवावी, असा टोला बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारला लगावला.
राज्य सरकारने मॉल-सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीस ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर चारी बाजूने शासनावर जोरदार टीका होत आहे. बंडातात्या कराडकर यांनीही सरकारवर निशाना साधला. आता सकाळी पेपर , दूध यासोबत शालेय पोषण आहार आणि मंदिरात देखील वाईन विक्रीस ठेवल्यास लोकांना ती विकत घेण्यास त्रास होणार नसल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे . राज्य शासनाच्या या निर्णयाला टोकाचा विरोध करताना असे समाज विघातक सरकार लवकरात लवकर रसातळाला जावे, अशी प्रार्थना परमात्म्याला करण्याची विनंती बंडातात्या यांनी केली आहे. आयुष्यभर वारकरी संप्रदायात काम करणारे बंडातात्या यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठी चळवळ उभी केल्याने आज हजारोंचे त्यांनी व्यसनमुक्त केले आहे. मात्र राज्य शासनाने समाजाला व्यसनाधीनतेकडे ढकलण्यासारखा घेतलेला या निर्णयाला विरोध करताना कधी उपरोधिक शब्दात तर कधी टोकेरी शब्दात जोडमार केला आहे.
शासनाच्या या निर्णयावर बंडातात्या यांनी, महाराष्ट्राचे शहेनशहा शरद पवार असा उल्लेख करत उद्धव ठाकरे आणि अजित पवार याना लक्ष केले आहे. राज्य शासनाच्या या चांगल्या आणि धाडसी निर्णयाचे स्वागत करतो, असे सांगत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एक धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे सांगितले. हा निर्णय सर्वसामान्य माणसाच्या अतिशय कल्याणाचा असून आधी ज्यांना दारूच्या दुकानात वगैरे जावे लागायचे ते आता तुमच्या निर्णयामुळे त्याचा त्रास वाचणार आहे, अशा शब्दात टोलेबाजी केली. या निर्णयामुळे सर्वांना दारूचे व्यसन जोडण्यास आणि त्याचे दुष्परिणाम होण्यासाठी चांगली मदत होईल. आपण नसलेले कोरोनाचेभूत आधीच समाजाच्या मानगुटीवर बसवलेले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या समाजाला आत्महत्येकडे जाण्यासाठी या वाईन विक्री निर्णयाचा चांगला उपयोग होईल असे सांगितले. आपण शासनाला अशी विनंती करतो की शासनाने आता भाजी विक्री आणि सकाळी दूध व पेपर विक्रेत्यांना घरोघरी देण्यासाठी दारूचे पाऊच दिले तर लोकांना घरच्याघरी दारू मिळेल असा टोला लगावला.
लहान मुलांच्या शाळेत जो खिचडीचा खाऊ देता तो बंद करून त्याही मुलांना रोज थोडी थोडी दारू दिली तर ते भारताचे सुधृढ असे नागरिक बनतील आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने आपला हा निर्णय चांगला ठरेल असा टोला लगावला. मंदिरामध्ये देखील दारूची उपलब्धता केली तर येणाऱ्या भाविकांना सुद्धा देवाच्या दर्शनासोबत तीर्थ ही मिळेल व त्यांचे सर्वांचे कल्याण होईल. यासाठी पुनश्च एकदा ठाकरे सरकारचे हार्दिक अभिनंदन करून शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे जल्लोषात स्वागत करावे, घरोघरी सडे, रांगोळ्या घालीत सर्वत्र रोषणाई करून फटाक्यांची आतिषबाजी करावी अशी जनतेस प्रार्थना असल्याचे सांगून बंडातात्या यांनी शासनाची अब्रू काढली आहे. शेवटी मात्र आपला संताप व्यक्त करताना असे हे समाज विघातक सरकार लवकरात लवकर रसातळाला जावे, अशी सर्वांनी भगवान परमात्म्याला प्रार्थना करण्याचे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.