(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बदलापूरच्या चिमुरड्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर स्थानिक संतप्त, बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Badlapur: बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. यावरुन बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. तर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
बदलापूर: कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असताना अशीच एक धक्कादायक घटना बदलापूर शहरात घडली आहे. बदलापूर पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याच्या संतापजनक प्रकार उजेडात आला आहे.
एकीकडे देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना कानावर येत असतानाच बदलापूर शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर आता स्थानिक नागरिक प्रचंड संतापले असून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तर आज या घटनेविरोधात पुकारलेल्या बदलापूर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
लाडकी बहीण योजना नको, तर सुरक्षित बहीण योजना हवी
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर यातील आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता, त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.
दुसरीकडे लहान मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाविरोधात या शाळेबाहेर पालक आणि बदलापूरकर मोठ्या संख्येने एकवटले आहेत. सोबतच नागरिकांनी बदलापूर बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शाळेसमोर जमलेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम केला असून नागरिक कुठल्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाहीत. आम्हाला लाडकी बहीण योजना नको, तर सुरक्षित बहीण योजना हवी अशी आर्त हाकही या नागरिकांकडून दिली जात आहे. तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी ,मागणीही नागरिकांनी केली आहे.
4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली-
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
आणखी वाचा