Bacchu Kadu Accident : आमदार बच्चू कडूंना धडक देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरुच, आरोपी सापडत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक
Amravati News : आमदार बच्चू कडूंना धडक देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरुच असून आरोपी सापडत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
Amravati News : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांना धडक देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध अजूनही सुरुच आहे. आरोपी सापडत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांचा 11 जानेवारी रोजी अपघात झाला होता. एका अज्ञात दुचाकीने बच्चू कडू यांना रस्ता ओलांडताना धडक दिली होती. सहा दिवस त्यांच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार झाले. परंतु एका माजी मंत्र्याला धडक देणाऱ्याला अमरावती पोलिसांनी अद्यापही पकडलं नाही. बच्चू कडू यांच्या वाहनचालकाला संशयितांचे फोटो दाखवले, मात्र तो ओळखू शकला नाही. अपघात होऊन आठ दिवस उलटून गेले तरी आरोपी अजूनही मोकाट आहे. त्यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुचाकीने धक्का देऊन पसार झालेल्या आरोपीला पोलीस केव्हा ताब्यात घेणार असा प्रश्न प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
माजी मंत्र्याला कोणीतरी धडक देऊन जातो आणि आठ दिवस उलटूनही पोलिसांना त्याला पकडण्यात यश न मिळाल्याने पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अनेक जणांची चौकशी केली. विशेष म्हणजे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वाहनाच्या ड्रायव्हरला पोलिसांनी संशयितांचे फोटो सुद्धा दाखवले पण ड्रायव्हरने कोणालाच ओळखले नाही.
रस्ता ओलांडताना बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला आणि पायाला दुखापत
रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिल्याने अपघात झाला होता. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर नागपूरमधल्या खासगी रुग्णालयात उपचार झाले असून ते सध्या नागपुरातच आहेत. दुचाकीने धडक दिल्यानंतर बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. 11 जानेवारीला बच्चू कडू यांचा अपघात झाला होता.
राजकीय नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरुच
गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या अपघाताचे (Accident) सत्र सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांचाही अपघात झाला होता. या अपघातात त्यांना देखील गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्याला (Pune) नेण्यात आलं होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (NCP Dhananjay Munde) यांच्या गाडीला देखील अपघात झाला होता.