काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निधी दिला : अशोक चव्हाण
मराठवाड्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा विषय पत्रकारांनी विचारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी केलेले खड्डेच मी बुजवतोय असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला.
परभणी : शिवसेनेसोबत जाण्याबाबत दिल्लीतील नेते नाराज होत, मात्र राज्यात भाजपकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे मी स्वतः जाऊन त्यांना भाजपला सत्तापासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेलच हे पटवून दिल्याने आपण महाविकास आघाडीत सामील झाल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेलेचं खड्डे बुजवण्याचे काम सध्या मला आहे, तेच मी करतोय. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाहीतर कारने जास्त फिरतोय, असा सणसणीत टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना परभणीत लगावला आहे.
अशोक चव्हाण हे आज परभणी दौऱ्यावर होते. त्यांनी परभणीत मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रस्ते, पूल आदींच्या दुरुस्तीसाठी आढावा बैठक परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. ज्यात प्रामुख्याने मराठवाड्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा विषय पत्रकारांनी विचारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी केलेले खड्डेच मी बुजवतोय असा टोला त्यांनी लगावला.
परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी, तक्रार दाखल
याशिवाय परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी नांदेड येथील टोळीला दिल्याचे प्रकरण हे अतिशय गंभीर असून यात कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ती टोळी कुठे आहे, कसं सगळं ऑपरेट करतेय याचा तपास नांदेड आणि परभणी पोलिसांची टीम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय विधानपरिषदेची 12 नावेही राज्यपालांकडे गेली आहेत, ती गोपनीय आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Sanjay Jadhav | मला जीवे ठार मारण्यासाठी 2 कोटींची सुपारी : शिवसेना खासदार संजय जाधव