(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : अशोक चव्हाणांची विजय वडेट्टीवारांवर टीका; म्हणाले, 'चांगलं होताना कुणी अपशकुन करू नये'
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. यावरून भाजप नेते अशोक चव्हाण यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.
Ashok Chavan on Vijay Wadettiwar : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मसुद्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मुसदा विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.
मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर निशाणा साधला. हे फसवं सरकार आहे. पुन्हा एकदा सरकारने मराठा समाजाची फसगत केली आहे. मराठा समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरु असल्याची टीका त्यांनी केली. यावरून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी वडेट्टीवारांना प्रत्त्युत्तर दिले आहे.
कुणी अपशकुन करू नये - अशोक चव्हाण
अशोक चव्हाण म्हणाले की, आज विधिमंडळात मराठा आरक्षणाबाबत विधेयक मंजूर झाले. शेवट गोड होतोय ही आनंदाची बाब आहे. हे आरक्षण निश्चितच टिकेल. विरोधी पक्षाने सरकारची बाजू घ्यावी, असे माझं मत नाही. पण एखादं चांगलं होत असताना कुणी अपशकुन करू नये, अशी टीका त्यांनी विजय वडेट्टीवारांवर केली आहे.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
आम्ही एक पत्र अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांना दिले होते. मुख्यमंत्री यांनी आमच्या प्रश्नाला बगल दिली. आतापर्यंत दोन वेळा आरक्षण दिले पण ते टिकू शकले नाही. हे फसवं सरकार आहे आणि पुन्हा एकदा सरकारने समाजाची फसगत केली आहे. 10 टक्के आरक्षण देत असताना याला ठोस आधार नाही. हे कायद्यात टिकणारे आरक्षण नाही. यांना निवडणूक काढून घ्यायची आहे. मागे झालं तसच सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मत घेण्यासाठी सरकारने हे फसवं काम केले असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
सभागृहात सर्व पक्षांनी एक मताने मराठा आरक्षण ठराव मंजूर केला. मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करून हे विधेयक मांडले गेले, हे विधेयक टिकेल अशी मला आशा वाटते. मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. मराठा समाजाने खूप लढा दिला आहे. मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले. आंदोलकांची जी डोकी फोडली गेली, ते न करता देखील आरक्षण देता येईल. टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Chandigarh : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, चंदीगड महापौर निवडणुकीची मतमोजणी आठ मतांसह पुन्हा होणार