शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा जीव घेतला : आशिष शेलार
कोविड खिचडी घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे देत असतो, असे म्हणत शेलारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
मुंबई : राज्यातले उद्योग तुम्ही बाहेर काढले, नानारला तुमचा विरोध, नवीन विमानतळाला विरोध करणारे तुम्ही आहेत. राज्याचा जीव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतला. महाराष्ट्र आजही गुंतवणुकीत नंबर वन आहे, अशा शब्दात आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिले आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, पत्राचाळ घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. कोविड खिचडी घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे देत असतो.
आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका
आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याचा तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. मुंबई, सातारा, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये ही वाघनखे नेणार. राज्यात जे आजपर्यंत टवाळखोर होते पण आज ते शंकेखोर झाले. ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्या शंकाखोरांचा कोथळा आम्ही बाहेर काढणार आहोत. आम्ही वाघ नखांच्या निमित्ताने राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित केले. ज्यांच्यात शंकेची कीड वळवळत आहे त्यानी या व्याख्यानाला यावे. आम्ही स्पष्टीकरण देत नाही तर सत्य मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मतांसाठी राजकारण सुरू
आशिष शेलार म्हणाले, विशिष्ट वर्गाची मते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शंका उपस्थित करणाऱ्यांना इतिहास नको, वापरलेली वाघ नख नको हे सर्व नियोजित आहे. महाराष्ट्राची जनता पाहत आहे. आजही मोहमद अली रोडवर बोर्ड आहेत त्यावर कुणी काळे फासत नाही. आज गुजराती शब्दावर तोडफोड करत आहेत. आमचे आव्हान आहे मोहमद अली रोडवर जे उर्दू आणि पारशी बोर्ड आहेत ते तोडफोड करून दाखवा.
आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
राज्य सरकारच्या वतीने आणण्यात येणारी वाघनखे नेमकी कोणती आहेत. राज्य शासनाच्या वतीने आणण्यात येणारी वाघनखे नेमकी कोणती आहेत, शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आहेत की शिवकालीन आहेत, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा :