Ashadhi Wari 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी 'सोन्या-खासदार' अन् 'राजा- सोन्या' बैलजोडीला मान; बैलजोडीची निवड नेमकी कशी केली जाते?
देहू येथून संत तुकाराम महाराजांचा रथ खेचण्यासाठी बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे. एकूण 18 बैलजोड्यांचे अर्ज आले होते.
Ashadhi Wari 2023 : देहू येथून संत तुकाराम महाराजांचा रथ खेचण्यासाठी बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे. एकूण 18 बैलजोड्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी देहूतील सुरेश मोरे आणि पिंपळे सौदागरच्या महेंद्र झिंझुर्डे यांच्या बैलजोडीची निवड झाली आहे. या दोन्ही वारकरी कुटुंबाला पहिल्यांदा हा मान मिळाला आहे. दोन्ही कुटुंबियांना पहिलाच मान मिळाल्य़ाने कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झाल्याच्या भावना झिंझुर्डे आणि मोरे कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत.
यंदाच्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला बैल जोडी जुंपण्याचा मान सुरेश मोरे कुटुंबियांना मिळाला आहे. हे कुटुंब अनेक वर्षांपासून वारीत जातात. त्यामुळे आपल्या बैलजोडीची वारीसाठी निवड व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे कोरोनापूर्वीपासून ते दरवर्षी अर्ज करत होते. मात्र कोरोनात वारी झाली नाही. त्यानंतर त्यांनी यावर्षी पुन्हा एकदा अर्ज करण्याचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे महिन्याभरापुर्वीच बैलजोडी खरेदी केली. महिनाभर या बैलजोडीचं चांगल्या पद्धतीने संगोपन केलं. बैलाच्या आहारावर लक्ष केंद्रीत केलं आणि त्यांनी यंदा अर्ज दाखल केला. सोन्या आणि खासदार अशी त्यांच्या रांंगड्या बैलांची नावं आहेत.
त्यानंतर महेंद्र झिंझुर्डे यांच्या बैलजोडीची देखील निव़ड झाली आहे. त्यामुळे झिंझुर्डे कुटुंबियांनी आपल्या बैल जोडीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीला जोडण्याचा मान मिळाल्याने साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त केली आहे. मागील तीन वर्षांपासून झिंझुर्डे कुटुंबिय अर्ज करत होते. मात्र यावर्षी त्यांना मान मिळाल्याने इच्छा पूर्ण झाल्याचं महेंद्र झिंझुर्डे म्हणाले. झिंझुर्डे यांनी सात लाखांना राजा आणि सोन्या नावाची बैलजोडी विकत घेतली होती. ही बैलजोडी कर्नाटकहून त्यांनी विकत घेतली होती. साधारण महिन्याला दोन हजार रुपये या बैलांच्या संगोपनाचा खर्च आहे.
बैलजोडीची निवड कोण करतात?
दरवर्षी आषाढी वारीत बैलजोडीला मान असतो. हा मान आपल्याला मिळावा यासाठी अनेक मालक इच्छुक असतात. त्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रमुखांसोबतच सात वारकरी बैलजोडीच्या निवड समितीत असतात.
बैलजोडीची निवड कशी केली जाते?
- बैलजोडी मालक शेतकरी असायला हवा.
- मालकांच्या कुटुंबियांची माहिती घेतली जाते.
- कुटुंबीय वारकरी आणि माळकरी असायला हवेत.
- वारीत सक्रिय सहभाग असायला हवा.
- बैलांच्या अनेक जाती आहेत. त्यात सोरटी, जरशी आणि खिल्लार या बैलांच्या जातीचा समावेश आहे. त्यात खिल्लार जातीच्या बैलांची निवड केली जाते.
- खिल्लार जातीचे बैल रांगडे असतात. त्यामुळे या बैलांना प्राधान्य दिलं जातं.
- वशिंडाचा आकार तपासला जातो.
- बैलाचे शिंग सारखे असायला हवेत.
- पायाला किंवा शरीराला कोणतीही दुखापत नसावी.
- साधारण कसलेल्या बैलाला प्राधान्य दिलं जातं.
- गुडघे आणि पायांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसावा.
- पायाची नखं सारखी असावी.
पालखी रथासाठी अर्ज दाखल झालेल्यांची नावे :
सूरज ज्ञानेश्वर खांदवे (कलवड, लोहगाव), विक्रम भगवान जगताप (वाल्हेकरवाडी, चिंचवड), सागर विलास लोणकर (उत्तमनगर, हवेली), तानाजी तुकाराम दगडे (बावधन, ता. मुळशी), निखिल सुरेश कोरडे (नांदेडगाव, ता. हवेली), संग्राम ऊर्फ रोहन सागर टिळेकर (धायरी, हवेली), गणेश नारायण भुजबळ (टाळगाव, चिखली), जीवन अर्जुन जांभुळकर (हिंजवडी, ता. मुळशी), उमेश सूर्यकांत साखरे (हिंजवडी, ता. मुळशी), महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे (पिंपळे सौदागर), संदीप पोपटराव वाल्हेकर (वाल्हेकरवाडी, चिंचवड), कैलास तुकाराम सातव (वाघोली), ओमराज भानुदास खांदवे (वडूखुर्द, हवेली), प्रशांत प्रकाश शेडगे (भुगाव), बाळकृष्ण बबन साखरे (हिंजवडी, ता. मुळशी), सुरेश दिंगबर मोरे (येलवाडी), बबनराव रमाजी काटे (पिंपळे सौदागर) आणि गुलाबराव आबाजी कुंजीर (पिंपळे सौदागर)