Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज देऊळगाव मही मुक्कामी; तर गजानन महाराजांच्या पालखीचा आज रिसोड येथे मुक्काम
Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील ठिकठिकाणांहून पालखीचे प्रस्थान झाले आहे. संत गजानन महाराज, संत मुक्ताई यांची पालखी आज कोणत्या ठिकाणी मुक्काम असणार आहे हे जाणून घ्या.
Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? तसेच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा कधी असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज रिसोड येथे मुक्काम
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी समजल्या जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी किनखेडा येथून प्रस्थान झाले. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम रिसोड या ठिकाणी असणार आहे. उद्या पालखी पानकन्हेरगांव येथून प्रस्थान करेल. तर, रात्री पालखीचा मुक्काम सेनगांव येथे असणार आहे.
माता रूक्मिणीच्या पालखीचा आज कसोडा, ता. मंगरूळ नाथ, जिल्हा वाशिम येथे मुक्काम
यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी देऊळगाव मही मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवार 16 जून रोजी ही पालखी टाकरखेड येथे प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम देऊळगाव राजा या ठिकाणी असणार आहे.
संत निवृत्तीनाथ पाळखीचा आज पळसे येथे मुक्काम
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज पळसे मुक्कामी असणार आहे. तर, उद्या म्हणजेच 16 जून रोजी पालखी सकाळी पळसेहून निघून दुपारी शिंदे,पास्ते येथे प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री लोणारवाडी येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे पाहता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; 700 भाविक 5 जिल्हे, 750 किमी अंतर पार करत आषाढीला पंढरपुरात पोहचणार
- Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज भालेगांव मुक्कामी; तर माता रूक्मिणीच्या पालखीचा कुऱ्हा येथे मुक्काम
- Ashadhi Wari 2022 : गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान; असा असेल पालखीचा मार्ग