येत्या 30 जुलैनंतर मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार : बबनराव लोणीकर
मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. आतापर्यंत 122 मिमी पावसाची नोंद याठिकाणी झाली आहे. एवढ्या कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात कृत्रिम पावसाची गरज आहे.
जालना : पावसाने ओढ दिलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. येत्या 30 जुलैनंतर मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.
मराठावाड्यात कमी पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्र सरकारकडे अर्ज केले आहेत, त्या परवानग्या लवकरच मिळणार आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणाऱ्या विमानाला औरंगाबाद विमानतळावरुन उड्डाणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारी रडार यंत्रणेचीही परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.
साधारण 30 जुलैपर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणांच्या परवानग्या राज्य सरकारला मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 30 कोटी रुपयांचा निधी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे लवकरच मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल, असं बबनराव लोणीकर यांनी सांगितलं.
मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. आतापर्यंत 122 मिमी पावसाची नोंद याठिकाणी झाली आहे. एवढ्या कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात कृत्रिम पावसाची गरज आहे.
राज्यात 2003 साली पहिल्यांदा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला होता. 2003 साली राज्यात झालेल्या प्रयोगाच्या वेळी ‘पायपर शाईन’ या विमानातून ढगांमध्ये पावसाची बिजे फवारण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्येही राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत.