इंदापूर तालुक्यात 17 हजार मतदार बोगस? लोकसभा आणि विधानसभेलाही मतदान केलं; सरपंचांच्या दाव्याने खळबळ
प्रताप पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

Bogus Voter Indapur: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केल्यानंतर आता इंदापूर तालुक्यातील निरनिमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी याबाबत दावा केला आहे. इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव या एका गावात 200 पेक्षा अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. तालुक्यात तब्बल 17 हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा दावा प्रताप पाटील यांनी केला असून त्याबाबतचे काही पुरावे देखील पाटील यांनी सादर केले आहेत. एवढेच नव्हे तर या मतदारांनी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांत मतदान केलं असल्याचा आरोप ही पाटील यांनी केला. प्रताप पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटल आहे.
अल्पवयीन असलेल्या तब्बल 40 युवकांनी मतदान केलं
इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यातील 78 मतदार बोगस असल्याचे आदेश दिले होते, मात्र त्यांच्या बदलीपूर्वी आदेशावर सही होऊ शकली नाही. नवीन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी मात्र या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे व मलवडी येथील 24 जण,इंदापूर तालुक्यातील कळब येथील 28, कालठण नं. 1 येथील 6, बोरीचा 1, आटपाडीतील 3, कोंडीजचा 1, उरुळी देवाचीचे 4, बारामतीतील पिंपळी व लिमटेक येथील 4,तसेच निरनिमगावात रहिवासी नसतानाही 102 जणांची नावे मतदार यादीत नोंदलेली असून अल्पवयीन असलेले तब्बल 40 युवकांनी मतदान केल्याचा पाटील यांचा दावा आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहा हजार बोगस मतदार?
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहा हजार बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. हे सर्व बोगस उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित कॉलेजच्या असल्याचा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरोप केला होता. तसेच तुळजापूर बोगस मतदार नोंदणी प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली होती. देशभरात मत चोरीचा मुद्दा गाजत असतानाच धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सहा हजार बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे. बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न करणारे लोक हे भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मुंबईतील तेरणा कॉलेजशी संबंधित असल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
























