kolhapur Municipal Corporation : कोल्हापुरातील रस्त्यांच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती, तीन दिवसात अहवाल देण्याचे आदेश
कोल्हापूर शहरातील खड्ड्यात पडून अभियंत्याच्या आईचाच जीव गेल्याचे एबीपी माझाने वृत प्रसिद्ध केल्यानंतर कोल्हापूर शहरातील भंगार झालेल्या सर्वच रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने हाती घेण्यात आले आहे.
kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर शहरातील खड्ड्यात पडून अभियंत्याच्या आईचाच जीव गेल्याचे एबीपी माझाने वृत प्रसिद्ध केल्यानंतर शुक्रवारपासून अत्यंत तातडीने कोल्हापूर शहरातील भंगार झालेल्या सर्वच रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे पॅचवर्क करत असताना चिंधीगिरी होत असल्याचेही एबीपी माझाने दाखवून दिले होते.
या रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी विभागीय कार्यालयाअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची व दर्जाची पाहणी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सर्व मंजूर कामांची संबंधीत अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करुन कामाचा दर्जा व सद्यस्थितीबाबत जिओ टॅग फोटोसह 3 दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या आहेत.
राज्य सरकारच्या व महानगरपालिकेच्या निधीमधून शहरातील विविध रस्त्यांची ठेकेदारामार्फत कामे करण्यात येतात. यामध्ये मुलभूत सेवा सुविधा अनुदानातील 58 कामे आहेत तर महापालिकेच्या स्वनिधीमधून डांबरी पॅचवर्कची 7 कामांना मंजूरी देण्यात आली होती. शहरातील विविध रस्त्यांची कामे मंजूर होऊन पूर्ण झाली अस. परंतु या रस्त्यावर खड्डे पडून रस्ते खराब झालेले आहेत. काही कामांच्या दोष दायित्व (DLP) कालावधीमध्ये काही रस्ते खराब होऊनही ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत.
पाहणी करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक 1 अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे अनुदानातील 27 कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनिल काटे यांच्याकडे अनुदानातील 9 कामाची व पॅचवर्कच्या 2 कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय कार्यालय क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे अनुदानातील 10 कामांची व पॅचवर्कच्या एका कामांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
विभागीय कार्यालय क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे अनुदानातील 8 कामांची व पॅचवर्कच्या 2 कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय कार्यालय क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी यांच्याकडे अनुदानातील 4 कामांची व पॅचवर्कच्या 2 कामांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या