![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Appasaheb Pawar Birth Annivarsary : आप्पासाहेब पवार यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांची कारकिर्द...
Appasaheb Pawar Birth Annivarsary : आप्पासाहेब गणपतराव पवार हे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.
![Appasaheb Pawar Birth Annivarsary : आप्पासाहेब पवार यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांची कारकिर्द... Appasaheb Pawar Birth Annivarsary know more about appasaheb pawar Appasaheb Pawar Birth Annivarsary : आप्पासाहेब पवार यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांची कारकिर्द...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/a68ab01718a9e963d55de59c1f57833a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Appasaheb Pawar Birth Annivarsary : डॉ. आप्पासाहेब गणपतराव पवार हे महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ होते. मुरब्बी प्रशासक, मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधक आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याचे ते पहिले शिक्षण संचालक होते. त्यांचा जन्म कुरुंदवाड संस्थानातील मुचंडी या बेळगावपासून जवळ असलेल्या एका खेडेगावात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव, तर आईचे नाव गंगाबाई होते. आज आप्पासाहेब यांची जयंती. या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात...
महाराष्ट्र शासनाने 1962 साली दक्षिण महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली. त्या नवीन विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून शासनाने आप्पासाहेबांची नियुक्ती केली. नव्याने स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या उभारणीचे मोठे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दूरदृष्टीने शिवाजी विद्यापीठाच्या भावी वाटचालीची भक्कम पायाभरणी केली. कठोर परिश्रम घेऊन त्यांनी कोल्हापूरच्या निर्जन, उजाड सागर माळावर चैतन्यशाली विद्यानगरी वसविली. नवोदित प्रादेशिक विद्यापीठाच्या सर्व गरजा लक्षात घेऊन त्यांनी शिवाजी विद्यापीठाची उभारणी केली. त्यांच्या कार्यकाळातील विद्यापीठ परिसराचा विकास, प्रशासनाची भक्कम चौकट, मजबूत अर्थव्यवस्था, नावीन्यपूर्ण उपक्रम, योजना यांमुळे शिवाजी विद्यापीठाचा सर्वत्र नावलौकिक झाला. विद्यापीठाच्या उभारणीतील त्यांच्या असामान्य योगदानामुळे त्यांना शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार म्हटले जाते.
आप्पासाहेब अव्वल दर्जाचे इतिहास संशोधक होते. मराठ्यांच्या इतिहास संदर्भातील त्यांची कामगिरी प्रशंसनीय आहे. त्यांचे इतिहास संशोधनातील योगदान दोन प्रकारचे होते : 1. प्रकाशित शोधनिबंध. 2. ऐतिहासिक कागदपत्रांचे संपादन. त्यांचे निवडक 14 शोधनिबंध स्टडीज् इन मराठा हिस्ट्री (खंड–1) या ग्रंथात 1971 साली प्रकाशित झाले.
अखिल भारतीय इतिहास परिषद; इंडियन हिस्टॉरिक रेकॉर्डस् कमिशन; इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज्, कोलकात्ता; महाराष्ट्र इतिहास परिषद; भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे या इतिहास संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था–संघटनांचे ते क्रियाशील सभासद होते. 1971 साली ‘भारत- लंका आंतरविद्यापीठ महामंडळ’ या संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. आप्पासाहेबांचे पुणे येथे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)