शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करणार असल्याचं म्हटलं.
नाशिक : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदा करणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये केली. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं कोकाटे यांनी म्हटलं. शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्यांविरोधात कोणत्या कायद्यान्वये कारवाई करायची याची अडचण असते त्यामुळं नवा आवश्यक असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटल.
आम्ही जोपर्यंत कायदा तयार करत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांच्या नावांची यादी करता येणार नाही. त्यामुळं जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या व्यापाऱ्यांना शेत माल विक्री करावा याबाबतची यादी करता येत नाही. शेतकऱ्यांच्या फसवूणक टाळण्यासाठी पोलिसांनी कारवाई कशी करावी याबाबतचा निर्णय पोलीस दलातील अधिकाऱ्यांना घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत,असं माणिकराव कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करणारा कायदा आणताना पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करणार असल्याचं कोकाटे म्हणाले.
कृषी खातं संवेदनशील असून मी त्याच्या दुप्पट संवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे फोन उचलले जातील, कारवाई केले जातील, न्याय दिला जाईल. वेळ पडल्यास गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. याशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर कायदा केला जाईल, मंत्रिमंडळात विषय मांडला जाईल, असं माणिकराव कोकाटे म्हणाले. पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना वेगळी वागणूक देतात याबाबतचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा आगामी मार्च महिन्यात आणला जाईल, अशी माहिती कोकाटे यांनी दिली. नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकरी आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही घोषणा केली. नाशिकमधील ही बैठक कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सह्याद्री फार्मचे विलास शिंदें उपस्थित होते.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची काही व्यापाऱ्यांकडून फसवूणक झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. याप्रकरणी नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र, पोलीस तपास होत नसल्याने बैठक बोलावण्यात आली होती.
दरम्यान, पीक विमा घोटाळ्यासंदर्भात काही भागातील तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आणि पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करु असं माणिकराव कोकाटे म्हणाले. पीक विम्याचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पीक विमा कंपन्यांचे चुकीच्या कामात सहभागी असलेले अधिकारी कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करु, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
इतर बातम्या :