गडचिरोलीत आणखी एका हत्तीच्या मृत्यूने वनविभागात खळबळ, 2 वर्षीय हत्ती पिलाचा अज्ञात कारणाने मृत्यू
आज अचानक मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव 'अर्जुन' असून मंगला या हत्तीणीने 15 जानेवारी 2019 ला मकर संक्रांतीच्या दिवशी त्याला जन्म दिला होता.
गडचिरोली : महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोलीच्या कमलापूर येथे आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. 3 आगस्ट रोजी 'सई' या हत्तीचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूचं नेमक कारण काय हे अजूनही कळले नाही. त्याचा शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आज अचानक मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव 'अर्जुन' असून मंगला या हत्तीणीने 15 जानेवारी 2019 ला मकर संक्रांतीच्या दिवशी त्याला जन्म दिला होता. त्याचे नामकरण करून 'अर्जुन'असे नाव ठेवण्यात आले होते. केवळ तीस महिन्याचा अर्जुन या नावाच्या हत्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजूनही कळू शकले नाही. मात्र, अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शासकीय हत्ती कॅम्प मध्ये हत्तीचे मृत्यू ओढवत आहेत. 29 जून 2020 ला 'आदित्य' नावाच्या 4 वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. अनेक मृत्यूनंतरही इथल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वन विभागात कसे झाले हत्ती शामिल
गडचिरोली जिल्हा म्हणजे घनदाट जंगल. आदिवासींचे जगणे आणि मोह सागवानाची झाडे सोबतच नक्षल कारवाया असा इतिहास. मात्र या जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात वास्तव्याला असलेल्या आदिवासींच्या दैनंदिनीचा भाग आहे राज्याचा वनविभाग. त्यातही इमारती लाकूड रूपात सोन्याची डिमांड असलेल्या बहुमूल्य सागवान वृक्षाचा प्रदेश असलेल्या दक्षिण गडचिरोली विभागात लाखो इमारती लाकडाची वाहतूक करण्याचे काम करतात चक्क हत्ती. हे गजराज वनविभागाच्या सेवेत अगदी इंग्रजांच्या काळापासून आहेत.
1908 वर्षांपासून वनविभागात हत्तीच्या सहाय्याने लाकूड वाहतूकीचे काम सुरु आहे. प्रारंभीच्या काळात नेमके किती हत्ती या पातानिल परिसरात आणले गेले याची नोंद वनविभागाकडे नसली तरी जाणकारांच्या मते हत्तीच्या दोन जोड्याद्वारे इथे वाहतुकीचे काम सुरु झाले. अत्यंत अवजड आणि जियरीचे असलेले हे काम हत्तीच्या माध्यमातून करणे तुलनेने कमी त्रासदायक असल्याचे लक्षात आल्यावर तत्कालीन सरकारने या हत्तीच्या संख्या वाढवण्याची परवानगी दिली. वनविभागाकडे आलपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पातानिल कॅम्पमध्ये नंतर असलेल्या हत्तीची 1956 पासूनची नोंद आहे. नंतर कालांतराने कमलापूर वनपरिक्षेत्रात हत्तींना शामिल करण्यात आले.