'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
बीडमधील वाढती गुंडागर्दी आणि दहशतीवरुन अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, बीडच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे गप्प का आहेत, असा सवालही विचारला.
मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshkmukh) हत्याप्रकरणातील काही आरोपींना अद्यापही अटक करण्यात न आल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त आहे. तसेच, राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून 28 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रकरणी इशारा दिला असून आजच ते मस्साजोग गावात पोहोचले आहेत. कोणाचा बाप आला तरी हे प्रकरण मी दबू देणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर, 28 डिसेंबरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाही (Anjali Damania) बीडमध्ये येणार आहेत. त्यामुळे, बीडमधील वातावरण तणावग्रस्त बनलं आहे. त्यातच, अंजली दमानिया यांच्याकडून सातत्याने बीडप्रकरणावर भाष्य करत वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. आता, दमानिया यांनी आणखी काही फोटो शेअर केले आहेत.
बीडमधील वाढती गुंडागर्दी आणि दहशतीवरुन अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, बीडच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे गप्प का आहेत, असा सवालही विचारला. तसेच, बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडेंच्या समर्थकांकडून बंदुक बाळगत दहशत पसरवली जात असल्याचे सांगत त्यांनी यापूर्वी व्हिडिओ शेअर केले होते. बीडच्या पोलीस अधिक्षकांनी या व्हिडिओची दखल घेत संबंधितांवर गुन्हाही दाखल केला आहे.आता, आणखी एका फोटो दमानिया यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये, एक युवक कमरेला बंदुक लावून दहशत पसरवत असल्याचे पाहायला मिळेत. तसेच, या युवकाचा एक फोटो मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेतही दिसून येत आहे. त्यावरुनच, वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत.. अशा आशयाचे ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
आणि एक पिस्तुल धारी माणूस.. असे म्हणत नाव न घेत धनंजय मुंडेंनाही लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. दाउतपुर ता.परळी येथील सरपंच कांता फड व मुलगा कुणाल फड अवैध शस्त्र बाळगून दहशत पसरवतात? वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली? असे दमानिया यांनी म्हटलं आहे. तसेच, ही तक्रार सुद्धा एसपी नवनीत कावत यांना दिली, कारवाईची अपेक्षा असल्याचंही त्यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. दरम्यान, बीडमध्ये 1200 पेक्षा जास्त नागरिकांना बंदुकीचे परवाने देण्यात आल्यासंदर्भातही त्यांनी आवाज उठवला होता. तसेच, या बंदुकधारी परवान्यांना कुणाची शिफारस होती, असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला होता.
हेही वाचा
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती