सीबीआय केसमध्ये जामीनासाठी देशमुखांची हायकोर्टात धाव, 11 नोव्हेंबरला होणार सुनावणी
Anil Deshmukh Moves Bombay High Court : मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला देशमुखांकडून हायकोर्टात आव्हान, ईडीच्या केसमधील जामीनाच्या आधारावर जामीनाची मागणी
Anil Deshmukh Moves Bombay High Court : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. देशमुखांच्यावतीनं बुधवारी सुट्टीकालीन कोर्टापुढे ही याचिका सादर करण्यात आली. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी यावर सीबीआयला 9 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी 11 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळ्याच्या निर्णयाला देशमुखांतर्फे हायकोर्टात आव्हान दिलं गेलंय.
याच प्रकरणात ईडीनं नोंदवलेल्या प्रकरणात हायकोर्टानं त्यांना नुकताच जामीन मंजूर केलाय, जो सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवलाय. त्यामुळे सीबीआयच्या याच संदर्भातील एफआयआरमध्येही आपण जामीनास पात्र आहोत असा दावा देशमुखांच्यावतीनं या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच माफीचा साक्षीदार सचिन वाझेच्या साक्षीला सत्र न्यायालयानं दिलेलं महत्त्व हे हायकोर्टानं जामीन मंजूर करताना नोंदवलेल्या मताच्या विरोधात असल्याचा दावाही या याचिकेतून करण्यात आला आहे.
दरम्यान, गृहमंत्री पदाचा गैरवापर करून आर्थिक गंभीर गुन्हे केल्यामुळे ते जामीनास पात्र नाहीत, असा दावा सीबीआयनं देशमुखांच्या अर्जाला विरोध करताना केला होता. देशमुख हे लोकप्रतिनिधी असून त्यांना जामीन मंजूर केल्यास राजकीय संबंधांचा फायदा घेऊन साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठीही देशमुख हे आपल्या पदाचा दुरुपयोग करू शकतात. एवढेच नव्हे, तर ते देश सोडून पळून जाऊ शकतात, अशी भीती सीबीआयने देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना सत्र न्यायालयात व्यक्त केली होती.
ईडीप्रकरणात देशमुखांना जामीन मिळाला असला तरीही सीबीआय प्रकरणात देशमुखांविरोधात भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे देशमुखांची याचिका रद्द करा, अशी मागणी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी सत्र न्यायालयात केली होती. भ्रष्टाचार करण्याचा कोणीह प्रयत्न केला तरी सीबीआय केसमध्ये गुन्हा ठरतो इथे स्पष्टपणे भ्रष्टाचार झाला आहे देशमुखांचा मुलगा सलिल यालाही या प्रकरणाची माहिती होती. देशमुखांनी आपल्य़ा पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचे पुरावे असल्याचा दावाही सिंह यांनी केला होता. या भ्रष्टाचार प्रकऱणात बडतर्फ पोलीस निरीक्षकल सचिन वाझे सहआरोपी नसून माफीचा साक्षीदार बनला आहे, तेव्हा त्याची साक्ष आणि नोंदवलेला जबाब महत्वाचा आहे. संजय पाटील आणि सचिन वाझे या दोघांमधील महत्त्वाचे मोबाईल संभाषण हाती लागले असून त्यात वसुलीबाबत बातचीत चर्चा झाल्याचे दिसून येत आहे असा युक्तिवादही सिंह यांनी केला होता.