Deepak Kesarkar: तुळशी विवाहपर्यंत आपली दिवाळी, तोपर्यंत आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार: केसरकर
Deepak Kesarkar: आनंदाची शिधा वितरणात होत असलेल्या दिरंगाईचा मंत्री दीपक केसरकर यांनी बचाव करत तुळशी विवाहपर्यंत दिवाळी असते, तोपर्यंत शिधा वितरीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Anandacha Shidha: तुळशी विवाहपर्यंत आपली दिवाळी असते. त्यामुळे उशिरा का होईना पण 'आनंदाचा शिधा' (Anandacha Shidha) घरोघरी पोहचणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालक मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले. आम्ही लोकांची दिवाळी गोड केली असल्याचा दावाही त्यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. यात दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली होती. अनेक ठिकाणी रेशनिंगच्या दुकानावर आनंदाचा शिधा पोहचला नसल्याने लोकांना खुल्या बाजारातून चढ्या दराने फराळासाठीचे पदार्थ घ्यावे लागले. केसरकर यांच्या या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने महागाईच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी 'आनंदाची शिधा' जाहीर केली होती. राज्यातील अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा पोहचला आहे. तर अद्याप बऱ्याच ठिकाणी नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळालेला नाही. दिवाळी सुरु झाली असतानाही अद्याप अजून बऱ्याच लोकांना हा आनंदाचा शिधा मिळाला नाही. अजूनही बरेच लोक या आनंदाच्या शिधाच्या प्रतीक्षेत आहेत. यातच राज्यात काही ठिकाणी याचा काळाबाजार ही सुरु झाल्याचे वृत्त आहे. दिवाळीनंतर हा शिधा मिळून काय उपयोग असा संतप्त प्रश्न जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच मंत्री केसरकर यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर यांना आनंदाचा शिधा वितरणाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, तुळशी विवाहपर्यंत आपली दिवाळी असते. उशिरा का होईना पण आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. आनंदाचा शिधातील साहित्याची पॅकेजिंग करणे व इतर कामांमध्ये वेळ लागत असल्याने उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार आनंदाचा शिधा वितरीत होत असून लोकांची दिवाळी गोड झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांनी पुढे म्हटले की, नागरिकांना हे आपलं सरकार वाटतं. नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारविरोधात लिहून रोष ओढवून घेतला होता. खऱ्या अर्थाने आता जनतेच्या मनातील सरकार आले असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
अतिवृष्टीची तातडीने पंचनामे केले जाणार असून तातडीने शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो. आम्ही आसूड ओढण्याची भाषा करत नाही. अडीच वर्षे सत्तेत होते पण शेतकऱ्यांना मदत केली नाही असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांबाबत बोलत रहायचं पण शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही, असं म्हणत केसरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही घडवत असून बोलणारे सरकार आणि करणारे सरकार यातला फरक दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: