Nagpur Crime : अडीच लाखात ठरला आठ महिन्याच्या चिमुकल्याचा सौदा; पोलिसांची सतर्कता अन् टोळीचा पर्दाफाश
ऑटोचालक असलेल्या बबलूला एका जोडप्याने आम्हाला मुलगा दत्तक हवाय असे सांगितले. त्यानंतर बबलूने याची माहिती इतर आरोपींना सांगितली. यावेळी आरोपींनी चिमुकल्याचा सौदा अडीच लाख रुपयात ठरवला होता.
Nagpur Crime News : शहरातील चिखली झोपडपट्टीतून आठ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण (child kidnapped) करण्यात आले होते. पोलिसांनी जलदगतीने तपासचक्र फिरवत आठ तासात या प्रकरणाचा छडा लावला आणि मुलाला त्याच्या आईच्या स्वाधिन केले. तसेच मुलांचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांच्या (Nagpur Police) सतर्कतेने झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून सूत्रधारासह तिघे अद्यापही फरार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जितेन निशाद (8 महिने) असे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर, फरजाना ऊर्फ असार कुरेशी (40) रा. कुंदनलाल गुप्तानगर, सीमा परवीन अब्दुल रऊफ अंसारी (38) रा. विनोबा भावेनगर, बादल धनराज मडके (35) रा. भोसलेवाडी, पाचपावली, सचिन रमेश पाटील (45) रा. इंदोरा मॉडल टाऊन, जरिपटका अशी अटकेतील आरोपींची तर सूत्रधार श्वेता खान रा. बालाघाट आणि योगेंद्र प्रजापती रा. कोटा राजस्थान, रिटा प्रजापती अशी फरार आरोपींची नावे आहेत.
फरार आरोपी हे फिर्यादीच्या घरासमोर खोली घेऊन राहत होते. त्यांनी महिन्याभरात फिर्यादीसोबत चांगले संबंध बनवून ठेवले. यादरम्यान ऑटोचालक असलेल्या बबलूला एका जोडप्याने आम्हाला मुलगा दत्तक हवाय असे सांगितले. त्यानंतर बबलूने याची माहिती इतर आरोपींना सांगितली. यावेळी आरोपींनी चिमुकल्याचा सौदा अडीच लाख रुपयात केला. तसेच संधी साधून फरार असलेल्या आरोपींनी बाळाला घेऊन खोलीला कुलूप लावून पळ काढला. सुरुवातीला फिर्यादी यांना विश्वासच बसला नाही, मात्र रात्रीपर्यंतही बाळ मिळाले नसल्याने त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या आरोपीच्या खोलीच्या झडतीत अजून काही लहान मुलांचे कपडे सापडले असल्याची माहिती आहे.
अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडीत, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त संदीप पखाले, यांच्यासोबतच यशोधरानगर, कळमना, पारडी ठाण्याचे कर्मचारी, युनिट पाच आणि युनिट दोनचे पथक यांनी संयुक्तरित्या तपास करीत काही तासांतच उलगडा केला. पोलिस आयुक्तांनी तपास पथकाला एक लाखाच्या पुरस्कार देण्याची घोषणा केली.
चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने अपहरण
गुरुवारी सकाळी बाळाचे वडील राजू कामावर निघून गेले. आई राजकुमारी धुणीभांडीची कामे करते. बाळाला आत्याकडे ठेवून तीसुद्धा कामावर गेली. दुपारी बाळासह घरी परतली. बाळाला खेळण्यासाठी घरासमोर सोडून ती स्वयंपाकात व्यस्त झाली. घरासमोर राहणारा योगेंद्र प्रजापती तिथे आला. बाळाला फिरायला नेत चॉकलेट घेऊन देतो असल्याचे सांगून सोबत घेऊन गेला. सायंकाळ होऊनही योगेंद्र आणि बाळ परत न आल्याने बाळाच्या आईने चौकशी केली. तेव्हा योगेंद्रची पत्नी रिटा आणि दोन्ही मुलेसुद्धा घरी नसल्याचे समोर आले. अखेर आई-वडिलांनी कळमना ठाणे गाठून रात्री दहा वजता मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली.
मुलाची अडीच लाखांत विक्री
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. तत्परतेने टीम तयार करून रवाना करण्यात आल्या. कॉल डिटेल्स, सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत बिनाकी येथून फरजानाला ताब्यात घेतले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ऑटोचालक बबलू आणि सचिनला ताब्यात घेतले. चौकशी सुरू असताना त्यांनी चिमुकल्याला नागपुरातील दाम्पत्याला अडीच लाखात विकल्याची माहिती समोर आली. तत्परतेने मुलाला संबंधित दाम्पत्याकडून ताब्यात घेऊन आईच्या ताब्यात दिले. मुलाची खरेदी करणारे दाम्पत्य आणि त्याच्या वडिलालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मकोका अंतर्गत कारवाई
बाळाचे अपहरण करणारे योगेंद्र आणि पत्नी रिटा पूर्वी भंडारा, गोंदिया, छिंदवाडा, कोटा, बालाघाट, सिवनी या परिसरात अशाच प्रकारे वास्तव्यास असल्याची माहिती पुढे आली आहे. या भागातूनही त्यांनी मुले पळविली असल्याची शंका पोलिसांना आहे. दरम्यान प्रकरणाची सूत्रधार असणाऱ्या श्वेतावर यापूर्वीही याच संदर्भातील दोन गुन्हे दाखल आहेत. राज्याबाहेरही या प्रकरणाची पाळेमुळे असल्याची शंका अहे. यामुळेच तपास करून सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी पोलिस आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा