National Anthem Maharashtra Live Updates : राज्याच्या विविध भागात 'सामूहिक राष्ट्रगीत गायन', नागरिकांचा चांगला प्रतिसाद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक 11 वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले.
LIVE
Background
National Anthem Maharashtra Live Updates : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक 11 वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले. यावेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणीहून उभं राहून राष्ट्रगीताचं गायन केलं. दरम्यान, यामध्ये सर्व नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं होतं. त्याप्रमाणं राज्याच्या विविध भागात राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करण्यात आलं.
यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 'स्वराज्य महोत्सवाचे' आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आली. आज सकाळी 11 वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झालं. या राष्ट्रगीताच्या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सहभाग घेतला. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, सरकारने सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन अनिवार्य केलं होतं. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आलं होतं.
राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली होती. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला होता. तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने यासंबंधी परिपत्रक देखील जारी करण्यात आलं होतं.
जालना जिल्हाधिकारी आणि सर्वच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्याच सामूहिक राष्ट्रगीत गायन
Jalna : स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवानिमित्त राज्यभर एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे ऐलान केल्यानंतर जालना येथे देखील आज सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या सह वेगवेगक्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावत सामूहिक रित्या राष्ट्रगीताचे गायन केले.
शासकीय कार्यालयातच राष्ट्रगीताचे गायन, सामान्य नागरिकांपर्यंत माहितीच पोहोचलीच नाही
Yavatmal : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व शासकीय कार्यालये, नागरिकांनी ठिक अकरा वाजून एक मिनिटांनी राष्ट्रगीत म्हणायचे, असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. प्रत्यक्षात राष्ट्रगीताचे गायन केवळ शासकीय कार्यालयातच करण्यात आले. सामान्य नागरिकांपर्यंत आदेशच पोहोचला नाही. त्यामुळे नागरिक राष्ट्रगीतापासून वंचित राहिल्याचे चित्र यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी उपस्थित होते.
बीडमध्ये समूह राष्ट्रगीताच्या कार्यक्रमात मुस्लिम युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समूह राष्ट्रगीताच्या कार्यक्रमात सर्वांनीच सहभाग नोंदवला होता. बीड शहरातल्या कारंजा रोडवर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन समूह राष्ट्रगीताच गायन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम युवक समूह राष्ट्र गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन
Pune : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाअंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सुभाष भागडे, श्रीमंत पाटोळे, रोहिणी आखाडे, स्नेहल भोसले, राणी ताठे, सुरेखा माने तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एस. व्ही. युनियन विद्यालय, सोमवार पेठ येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी उपआयुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोन्दर्डे, नंदिनी आवडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्र गीतातून भारत मातेला मानवंदना
नेहमीच भाजीपालाच्या भावातील चढ उतार, शेतकरी आंदोलन, व्यापारी आडते वादामुळे चर्चेत असणारे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आज राष्ट्रगीताचे सूर कानी पडत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानंतर कृषि उत्पन्न बाजार समिती मधील अधिकारी कर्मचारी , शेतकरी व्यपारी माथाडी सारेच 11 वाजता स्तब्ध झाले. जो जिथे असेल तिथे उभा राहिला आणि भारत मातेला राष्ट्र गीतातून मानवंदना दिली.