National Anthem : आज सकाळी 11 वाजता 'सामूहिक राष्ट्रगीत गायन', नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Mass Singing of National Anthem : राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार आहे. यावेळी नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून राष्ट्रगीताचं गायन करावं.
National Anthem : राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे. यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 'स्वराज्य महोत्सवाचे' आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
आज म्हणजेच बुधवारी सकाळी 11 वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार आहे. राष्ट्रगीताच्या या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा असेही एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.
राज्यातील जनतेने बुधवारी सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. सरकारने सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन अनिवार्य केलं आहे. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आलं आहे.
राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय म्हणाले की, देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. राज्यातील अंगणवाड्या, सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची विद्यापीठे, खाजगी, शासकीय सर्व शैक्षणिक संस्था मधील विद्यार्थी, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे.