Amravati News : मनपा आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; अमरावतीत राजकारण तापलं
Amravati News : अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर शाईफेकण्यात आल्यानंतर आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यानंतर आता शहरातील राजकारणही चांगलच तापलं आहे.
Amravati News : अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर बुधवारी अचानकपणे शाइफेक झाल्याने एकच खळबळ उडाली होती. हा सगळा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याच्या प्रकरणातून घडला आहे. या प्रकरणात आमदार रवी राणा आणि इतर 11 आरोपींवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान या सर्व प्रकारणामुळे अमरावतीत आता राजकारणही चांगलंच तापलं आहे.
या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. ज्यावर बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, केवळ स्टंटबाजीसाठी अशा प्रकारे हल्ला करणे योग्य नाही. झालेल्या घटनेचा निषेध आहेच. तसंच अशा घटना रोखण्यासाठी काही नवीन कायदा करण्याची गरज आहे. कोणत्याही थोर पुरुषांचा पुतळा बसविण्यासाठी सरकार कधीही मनाई करीत नाही, पण आधी योग्य परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा घटना रोखण्यासाठी राजकारण्यांनी अंतर्मनातून मंथन करणे गरजेचे आहे.
मनपा अधिकारी कामबंद आंदोलनावर
दुसरीकडे या प्रकरणावरुन महानगरपालिका अधिकाऱ्यांनी रविवारपर्यंत कामबंद आंदोलन पुकारलं आहे. याबद्दल मनपा उपायुक्त म्हणाले, 'या भ्याड हल्ल्याचा निषेध असून काही विशिष्ट पक्षांकडूनच असे हल्ले होत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी 'आरोपींवर कठोर कारवाई करावी' असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
राष्ट्रवादीकडूनही निषेध
दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनी याबाबत बोलतना म्हणाले की, हा संपूर्ण प्रकार निंदनीय असून त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. अशा घटना घडत राहिल्या तर चांगले अधिकारी शहरात येत नाहीत. काल घडलेल्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच भावना सर्व लोकप्रतिनिधींची असली पाहिजे. तर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. सध्या त्या गोवा निवडणुकीच्या प्रचारात असून काँग्रेसकडून माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले करणे अत्यंत चुकीचे आहे. या घटनेमुळे अमरावती शहराची मान शरमेने झुकली आहे. असे हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
स्वाभिमान पार्टीकडून पालिकेवर आरोप
या सगळ्या प्रकारावर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'या संपूर्ण घटनेदरम्यान आमदार रवी राणा अमरावती शहरात नसतानाही त्यांच्यावर 307 सारखा गुन्हा दाखल करणे याकरता पोलिसांवर राजकीय दबाव आहे.
अमरावतीच्या शिवप्रेमींना मनपाच्या कारवाईमुळे तीव्र दुःख झाले आहे आणि त्यातून हा सर्व प्रकार घडला आहे. आमदार राणा आणि कार्यकर्त्यांवर राजकीय दबावामुळे गुन्हे दाखल होत आहेत.' असं युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या हल्ल्याचे पडसाद शहरात उमटले असून आता राज्यातील मनपा, नगरपालिका, नगर पंचायतीमध्ये कामबंद आंदोलन सुरु आहे. तर सगळीकडून निषेध होतं आहे. दरम्यान येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीत अजून काय काय होईल आणि काय साध्य होईल हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- अमरावतीच्या मनपा आयुक्तांच्या अंगावर फेकली शाई, युवा स्वाभिमान पार्टीच्या पाच जणांना अटक
- Amravati : मनपा आयुक्तांवर शाईफेक, 'हे' प्रकरण भोवल्याची चर्चा
- मनपा आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्यांना खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणांचे समर्थन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha