(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Winter Assembly Session: हिवाळ्यात पावसाळा,अधिवेशनातही घोषणांचा पाऊस, आंदोलनं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची विशेष तयारी
Winter Assembly Session: नागपूर येथे होणार हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक समाजाची मोठी आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास (Winter Assembly Session) येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचे वेळापत्रक विधिमंडळातर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले. आगामी निवडणुका (Lok Sabha Election 2024) डोळ्यासमोर ठेवून मोठ्या घोषणांची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. कोणत्या मुद्द्यावर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरतात आणि सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक समाज आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे 7 ते 20 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या राज्यात आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे विविध समाज अधिवेशनादरम्यान सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. नागपूर येथे होणार हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक समाजाची मोठी आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. मराठा समाजाबरोबरच इतर समाजाला डोळ्यासमोर ठेवून येत्या हिवाळी अधिवेशनात होणार घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शिंदे सरकारची विशेष तयारी
हिवाळी अधिवेशनात यावेळी सभागृहात चर्चा घडवून आणण्यासाठी सरकारी पक्ष आग्रही असून मोठया घोषणा ही केल्या जाणार आहे. यासाठी सर्व समाजासाठी काय योजना दिल्या आणि भविष्यात काय करता येतील यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच अनेक समाजाच्या शिष्टमंडळांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सोडवणं शक्य आहे का याचाही अभ्यास करण्यासाठी विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला झुकतं माप दिल्यावर इतर समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ नये म्हणून सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.
अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री?
हिवाळी अधिवेशनाच्या 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. म्हणजे 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे कामकाज 20 डिसेंबरपर्यंतच नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 20 तारखेलाच अधिवेशन गुंडाळलं जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु झाली आहे. नाशिक-पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, नागपूरमध्ये अतिवृष्टीने झालेलं नुकसान याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :