Weather Update : उकाडा वाढला! पुढील दोन दिवसात उष्णतेची लाट, आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता
IMD Rain Forecast : राज्यात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या शेवटी काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Weather Update Today : राज्यासह देशात कुठे ऊन, कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी (Unseasonal Rain) लावली. एप्रिल सुरु होताच मात्र उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हिमालयीन प्रदेशासह देशाच्या वायव्य भागात आज मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट
आज राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसात काही भागात अवकाळी पाऊस झाल्याचे उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. पण आज राज्यात पावसाची शक्यता नाही. आठवड्याच्या शेवटी राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसात मात्र राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
विदर्भात तापमान वाढलं
पुढील दोन-तीन दिवसांत राज्यात तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. विदर्भ तापमानाचा पारा वाढला. विदर्भाचा पारा 42 अंश सेसिअसच्या पार गेला आहे. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे 42.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वर्धा, यवतमाळ, वाशीम आणि अकोल्याचे तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर होते.
एप्रिल-मे महिन्यात उकाडा वाढणार
एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात वाढ होईल. यंदाचा उन्हाळा जास्त उष्ण राहण्याचा अंदाज आयएमडीचा (IMD) अंदाज आहे. लोकसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत. एप्रिल ते जून दरम्यान जवळपास संपूर्ण देशात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
शुक्रवारपासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत आद्रता वाढून 5 ते 8 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात. 6 ते 8 एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि 7 ते 8 एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.