(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPSC Success Story : नाशिकच्या पोरानं नाव काढलं! अक्षयचं 'अक्षय्य' यश; अक्षय म्हणतो, आता फक्त आई-वडिलांना घट्ट मिठी मारायचीये
UPSC Civil Service Final Result 2021: नाशिकच्या अक्षय वाखारेने युपीएससी परिक्षेत ऑल इंडिया रँक 203 (AIR 203) पटकवत आई-वडिलांचं स्वप्न पुर्ण केलं आहे.
UPSC Civil Service Final Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि पुण्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या अक्षय सुनिल वाखारेच्या आई-वडिलांचं स्वप्न पुर्ण झालं. अक्षयने य़ुपीएससीच्या परिक्षेत ऑल इंडिया रँक 203 (AIR 203) पटकवला आहे. अक्षयचा हा तिसरा प्रयत्न होता. तिसऱ्या प्रयत्नात अक्षयने यशाचं शिखर गाठलं आहे. अक्षयने मिळवलेल्या या यशामुळे त्याच्यावर आणि कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
कोण आहे अक्षय-
अक्षय हा मुळचा नाशिकचा. त्याचे वडिल नाशिकमधील करंन्सी नोट प्रेसमध्ये नोकरीला आहे आणि आई गृहीणी आहे. 2016 मध्य़े तो इंजिनिअरींगचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण पुर्ण केलं. 2017-18मध्ये कॉलेज असल्यामुळे त्याला अभ्यासाला फारसा वेळ मिळाला नाही. मात्र 2018 नंतर त्याने जोमात अभ्यासाला सुरुवात केली.आतापर्यंत त्याने दोनवेळा प्रयत्न केले मात्र त्याला यश मिळालं नाही. तिसऱ्या प्रयत्नात मात्र अक्षयने ऑल इंडिया रँक 203 मिळवत स्वत:ला सिद्ध केलं.
युनिक अकॅडमीमध्ये करायचा अभ्यास
पुण्यातील युनिक अकॅडमी ही युपीएससी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठीची मोठी अकॅडमी आहे. याच अकॅडमीतून अक्षयने अभ्यासाला सुरुवात केली. आतापर्यंत या अकॅडमीने अनेक अधिकारी घडवले आहेत. अजूनही अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याचं स्वप्न बघत या अकॅडमीत प्रवेश घेतात.
अभ्यासाची पद्धत
अभ्यासाची दिनचर्या कशी होती विचारल्यास अक्षय म्हणतो,'माझा स्पेशल विषय मानववंशशास्त्र (ANTHROPOLOGY) होता. माझी ठरवलेली दिनचर्या नव्हती. मात्र किती अभ्यास रोज करायचा हे मी नीट आखलं होतं. दिवसभरात कधीही तो अभ्यास पुर्ण करायचा हेच ध्येय असायचं. प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही किंवा कोणत्या ट्रिक्स वापरुन आपण योग्य उत्तर निवडू शकतो, याकडे माझं लक्ष असायचं. वेळ वाया जाणार नाही, याकडेदेखील लक्ष असायचं. ऑप्शनल आणि निबंधाचा मी फार सराव केला. लॉजिकल प्रश्नांवर जास्त भर दिला. कारण ते प्रश्न थोडे गोंधळात टाकणारे असतात. याच प्रश्नांचा मी फार सराव केला. योग्य जेवण, झोप आणि नियमित अभ्यास केला. त्यामुळेच कदाचित हे यश मिळालं आहे. माझ्य़ा अभ्यासावरुन या प्रयत्नात मी यशस्वी होईल, हे पक्क माहित होतं. मात्र रँक 203 येईल असं वाटलं नव्हतं.
कुटुंबीयांची प्रतिक्रिया
निकाल लागल्यापासून आम्हा सगळ्यांना अभिनंदनाचे कॉल येत आहेत. आई-वडिलांचं स्वप्न पुर्ण केल्याचा आनंद फार वेगळा असतो. तो आनंद मी जगतोय, अनुभवतोय. निकालानंतर आमचं फार बोलणं झालं नाही आहे. मात्र घरात काय वातावरण असेल? हे मी जाणू शकतो. उद्या थेट घर गाठणार आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघणार. आता फक्त एकच ईच्छा आहे घरी जाऊन आई-बाबांना मिठी मारायची आहे, असं अक्षय सांगतो.