ST Strike : एसटी संपकाळात बडतर्फ झालेल्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही, अनिल परबांचा इशारा
यापुढे एसटी कामगारांचे वेतन वेळेवरच होणार आहे. शिवाय एसटी संपकाळात बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही असा इशारा मंत्री अनिल परब यांनी दिला.
मुंबई : राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत (ST Strike ) आज परिवहन मंत्री अनिल पबर (Anil Parab) यांनी राज्य सरकारची भूमिका जाहीर केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. त्यामुळे यापुढे एसटी कामगारांचे वेतन वेळेवरच होणार आहे. शिवाय एसटी संपकाळात बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही असा इशारा मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार का? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी आज विधानपरिषदेत मंत्री अनिल परब यांना विचारला. यावर उत्तर देताना संपकाळात बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही अशी माहिती अनिल परब यांनी दिली. दरम्यान, 24 डिसेंबर 2021 पर्यंत 241 एसटी कामगारांना बडतर्फ करण्यात आले होते. दोन दिवस सुट्टीच्या दिवसांतील काऊंटींग वरुन हा आकडा आणखी वाढेल अशी शक्यता आहे.
"सुरुवातीला निलंबनाची कारवाई झाली. आम्ही आवाहन केले की निलंबन झाले तरी कामावर परत घेईन. कारवाया मागे घेऊ. निलंबन झालेल्यांनी कामावर यावे, दरम्यानच्या काळात जे कामावर रुजू झाले त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या. तरीही अनेक जण संपावर ठाम आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. एकदा बडतर्फीची कारवाई झाली आहे ती मागे घेणार नाही अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर तोडगा म्हणून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा आणि वेतन वेळेत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर काही संघटनांनी संपातून माघार घेत कामाव परतले तर काही संघटना संपावर ठाम आहेत. या संपामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. शिवाय विलिनीकरणाचा मुद्धा न्यायालयात गेला आहे. त्यामुळे संपकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी भूमिका मंत्री परब यांनी घेतली होती. परंतु, संप मागे न घेण्यावर अनेक संघटना ठाम राहिल्या. न्यायालयानेही अशा कर्मचाऱ्यांना नोटीसा पाठविल्या. परंतु, संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारने बडतर्फीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय एसटी संपकाळात बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही असा इशारा मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, "कोरोना काळात जे शासकिय सेवेत होते आणि कोविडने मृत्यू झाला आहे अशा केंद्राच्या निकषात बसणाऱ्या किंवा न बसणाऱ्या सर्वांना एसटीने 5 ते 10 लाख रूपयांची मदत केली आहे. शिवाय संपादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या एसटी कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्याबाबतची स्क्रुटिनी सुरु आहे. यावरही लवकरच तोडगा निघेल. त्याबरोबरच वेतन वेळेवर मिळणार नाही अशा अफवा पसरवल्या जात आहेत त्याला कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये. आता वेतनाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. त्यामुळे एसटी कामगारांचे वेतन वेळेवरच होणार."
महत्वाच्या बातम्या
- ST Strike : मी खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते : नाना पटोले
- ST Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात नकार
- ST Strike : कामगार संघटनेकडून संपातून माघारीबाबत अधिकृत माहिती नाही, एसटी महामंडळाची मुंबई उच्च न्यायालयात कबूली