(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jagdamba Sword: शिवरायांची जगदंबा तलवार 2024 पर्यंत ब्रिटनमधून परत आणणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
छत्रपती शिवरायांची पूजेची जगदंबा तलवार (Jagdamba Sword) ही सध्या ब्रिटनमध्ये असून ती महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
मुंबई: महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी असून शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं सांगत ही तलवार 2024 पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद आहे.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये 350 वर्षे पूर्ण होतील. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आम्ही एक आराखडा तयार करत असून यावेळी जर जगदंबा तलवार भारतात परत आली तर आमचा आनंद द्विगुणित होईल.
आज शिवप्रताप दिन साजरा केला जात असताना प्रतापगडावरील अफजलखानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवलं गेलं. त्याचवेळी आज आणखी एक महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. साधारणपणे 1875 ते 1876 च्या दरम्यान ही तलवार महाराष्ट्रातून ब्रिटनला गेली. त्यावेळचे प्रिन्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना काही भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जगदंबा तलवारीची समावेश होता.
शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली ही जगदंबा तलवार जर महाराष्ट्रात परत आली तर ती आनंदाची बातमी असणार आहे.
प्रिन्स ऑफ वेल्सने जबरदस्तीची भेट घेतली
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत जगदंबा तलवारीसंबंधी माहिती देताना म्हणाले की, "करवीर छत्रपतींच्याकडे शिवरायांच्या वापरातील एक तलवार होती. तिची नोंद कोल्हापूरच्या शस्त्रागारामध्ये जगदंबा अशी करण्यात आली होती. करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज, जे त्यावेळी 11 वर्षांचे होते, त्यावेळी म्हणजे 1875 साली ब्रिटिश प्रिन्स ऑफ वेल्स भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी तो भारतातील अनेक शस्त्रं घेऊन गेला. करवीर छत्रपतींकडून त्याने ही तलवार जबरदस्तीने भेट म्हणून घेतली होती. ही तलवार छत्रपती शिवरायांच्या वापरातील असल्याचं ब्रिटिशांच्या कॅटलॉगमध्ये नोंद आहे. ही तलवार परत आणावी यासाठी 19 व्या दशकामध्ये अनेकांनी प्रयत्न केले होते. आता ही तलवार परत आणल्यास आम्हा इतिहास प्रेमींना आनंदच होईल."