लालपरी सुस्साट! सहा वर्षानंतर पहिल्यांदाच फायद्यात, जुलै महिन्यात कमावला इतक्या कोटींची नफा
सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या 53 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत आहेत.
![लालपरी सुस्साट! सहा वर्षानंतर पहिल्यांदाच फायद्यात, जुलै महिन्यात कमावला इतक्या कोटींची नफा ST Bus in Profit after six years july Maharashtra News लालपरी सुस्साट! सहा वर्षानंतर पहिल्यांदाच फायद्यात, जुलै महिन्यात कमावला इतक्या कोटींची नफा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/14/9d80c47aff46a5cbcc0e2123ab0513ef172364793823489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गेली सहा वर्षे तोट्यात असलेली एसटी (ST Bus) आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. 'गाव तेथे एसटी' असं ब्रीद कायम ठेवताना आर्थिक अडचणींनादेखील एसटी महामंडळाला सामोरे जावे लागत होते. एसटी संपानंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आलेल्या एसटी समोर आर्थिक अडचणी कायम होत्या. जुलै महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा 22 कोटी इतका झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै,2024 मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 131 कोटी रुपयांनी तोटा कमी झाला आहे.
दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या 53 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत आहेत.
जुलै महिन्यामध्ये 31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यामध्ये
याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात " हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान", विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. जुलै महिन्यामध्ये 31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यामध्ये आले आहेत.
कोणत्या विभागाने कमावला जास्त नफा?
जालना (3.34 कोटी), अकोला (3.14 कोटी), धुळे (3.7 कोटी), परभणी (2.98 कोटी), जळगाव (2.40 कोटी), बुलढाणा (2.33कोटी) या विभागांनी 2 कोटी पेक्षा जास्त नफा कमावला आहे. ऑगस्ट महिन्यात उर्वरित विभाग देखील नफ्यामध्ये येतील व पर्यांयाने महामंडळ नफ्यात येईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)