(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur : "महाराष्ट्र पाणी देऊ शकत नसेल, तर कर्नाटकात जाऊ" मंगळवेढातील 24 गावांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितल्याने खळबळ
Solapur : "महाराष्ट्र आम्हाला साधे पाणी देऊ शकत नसेल, तर आम्ही कर्नाटकात जाणार, अशी भूमिका मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी घेतली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Solapur News : "महाराष्ट्र स्वातंत्र्य होऊन 64 वर्षे झाली तरी, महाराष्ट्र आम्हाला साधे पाणी देऊ शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाणार" अशी भूमिका घेतलेल्या मंगळवेढा (Mangalvedha) तालुक्यातील 24 गावांनी घेतली आहे, या गावातील लोकांनी आता थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या (Siddaramaiah) भेटीसाठी वेळ मागितल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवेढ्याचे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी कोणालाही कर्नाटक जायची गरज पडणार नसून, महाराष्ट्र न्याय देईल अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता संतप्त झालेल्या या 24 गावातील शेतकरी आणि पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत .
अजून किती वेळ न्यायासाठी वाट पाहायची? शेतकरी, ग्रामस्थ संतप्त
''ना प्यायला पाणी, ना शेतीला पाणी'' अशी अवस्था आमच्यात पिढ्यान पिढ्या भोगत असताना अजून किती वेळ न्यायासाठी वाट पाहायची? अशा भूमिकेवर हे हजारो शेतकरी आले आहेत . आता या 24 गावातील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. "आम्हाला तुम्ही अलमट्टी धरणातून पाणी द्यावे, आम्ही कर्नाटक मध्ये येण्यास तयार आहोत" असे साकडे सिद्धरामय्या यांना घालणार असल्याचे यावेळी अंकुश पडवळे आणि इतर जणांनी माझाशी बोलताना सांगितले. या गावात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यासाठी गेली 50 वर्षे फक्त तुम्हाला पाणी देतो म्हणून अनेक आमदारांनी आमदारकी मिळविली पण आम्हाला कधी पाणी मिळाले नाही. शेतीला तर थेंबभर पाणी नसल्याने पाऊस पडला तर आमचे पीक येते, अन्यथा दुसऱ्याच्या रानात आमच्या पिढ्या कामे करून कसेतरी जगतात. आता पिण्याच्या पाण्यासाठी देखील मारामाऱ्या नित्याच्या झाल्या असून पाणी घेण्यासाठी भांडणे सोडवावीत? की कामाला जाऊन पैसे मिळवावेत? हा आमच्या पुढचा प्रश्न असल्याचे खुपसंगी येथील उत्तम भोसले सांगतात.
"तर आम्ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू"
हीच अवस्था गावातील महिलांच्या असून आता इतर ठिकाणी कमाला गेलो तर चार पैसे जगण्यासाठी मिळू शकतील, पण प्यायला पाणी नसल्याने काम सोडून आधी पाणी आणायची वेळ आमच्यावर येते असे गाऱ्हाणे या महिला मांडतात. जर आम्हाला पाणीच महाराष्ट्र देणार नसेल तर आम्ही इथे राहून काय करायचे असा सवाल या गावातील महिला करीत आहेत. दरम्यान या 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित असून यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी देखील झाली आहे. मात्र लालफितीमध्ये हा प्रकल्प अडकून पडला असून लोकसभा निवडणूक आचारसंहिते पूर्वी जर या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी देऊन निधी वर्ग केला नाही, तर आम्ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटक मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे हे 24 गावातील ग्रामस्थ सांगतात. यासाठी या सर्व गावातून ग्रामसभेचे ठराव केले जात आहेत. उजनी धरणातील अतिरिक्त 2 टीएमसी पाणी या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस देण्यात येणार आहे.
ग्रामस्थांची समजूत घालण्याचा भाजप आमदाराचा प्रयत्न
नाराज झालेल्या 24 गावातील ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न भाजप आमदार समाधान अवताडे करीत असून, महाराष्ट्र तुम्हाला न्याय देईल, कोणीही कर्नाटक मध्ये जाण्याची गरज नसल्याचे ते सांगत आहे . मात्र लोकसभा आचारसंहितेपूर्वी हे काम होईल याबाबत ते स्पष्ट बोलत नसून लालफितीचा फटका त्यांनाही बसू शकतो याची जाणीव त्यांना आहे. अवताडे यांच्या पोटनिवडणुकीच्या वेळी प्रचाराच्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय राज्यात सत्ताबदल झाल्यावर 2022 च्या पावसाळी अधिवेशनात 15 दिवसात पाण्याचा निर्णय करू असे उत्तर फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते. आता या 24 गावातील ग्रामस्थ ही क्लिप दाखवत कोणावर विश्वास ठेवावा असा सवाल करीत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यास मंगळवेढ्याचे घोंगडे काठी घेऊन सिद्धरामय्या यांचा सत्कार करीत आम्हाला पाणी देण्याची मागणी केली जाणार असल्याचे आता हे ग्रामस्थ सांगत आहेत .
भाजपाला बसणार थेट फटका?
याचा फटका भाजपाला थेट बसणार असून मंगळवेढा येथील भाजप आमदार समाधान अवताडे आणि सोलापूर येथील भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या अडचणी वाढणार आहेत. लालफितीत अडकलेल्या या 24 गावांचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे वेळेत आणून त्यांना निधी मिळाल्यास शिंदे फडणवीस सरकार यांची नाचक्की कमी होऊ शकणार आहे .
हेही वाचा>>>
Pune News : पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा; ललित कला केंद्राच्या प्रमुखासह सहा जणांना अटक, कुलगुरुंची भूमिका काय?