(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी
Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटकसागर बर्वे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव
Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरून (Social Media) धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकानं रविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेनं यासंदर्भात कारवाई केली. स्थानिक न्यायालयाकडून 13 जूनपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथकं तयार करण्यात आली होती. अखेर पवारांना धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं. दरम्यान, आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीनं हे पाऊल का उचललं याचा शोध मात्र सुरू आहेत.
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रीया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा आधार घेतला. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवर 'नर्मदाबाई पटवर्धन' या नावानं एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.
मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय म्हणालेल्या सुप्रीया सुळे?
शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.