(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अखेर रिलायन्सकडून पीक विम्याचा परतावा सुरु, 17 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा
एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठे यश; कृषी मंत्री-स्थानिक प्रशासनाने घेतली होती आक्रमक भूमिका
यंदा अतिवृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही राज्य सरकारकडे असलेल्या थकबाकीचे कारण पुढे करून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा देण्यास नकार देण्यात आला होता. परंतु एबीपी माझाने केलेल्या पाठपुराव्यानंतर कृषी मंत्री आणि स्थानिक प्रशासनाने कारवाईची भूमिका घेतली. शिवाय अनेक शेतकरी संघटनांनीही संघर्ष केल्याने अखेर रिलायन्सने नरमाईची भूमिका घेत 17 लाख शेतकऱयांचे 430 कोटी रुपये मंजूर करत खात्यावर जमा करण्यास सुरुवात केलीय.ने मकं काय काय घडलं यावरील एबीपी माझाचा खास रिपोर्ट..
राज्याच्या इतिहासात यंदा कित्येक वर्षांनी सर्वत्र अतिवृष्टी झाली.ओढे,नदी,नाल्यांच्या काठावरील पिकं अक्षरशः वाहून गेली,सोयाबीनची माती झाली तर कापूस पूर्णपणे भिजून गेला. लाखो हेक्टरवरील पीक जमिनोदोस्त झाली. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार होता, तो पीक विम्याचा. मात्र परभणी,जालना,बुलढाणा,सांगली,कोल्हापूर,वर्धा,नंदुरबार,नागपूर गोंदिया,भंडारा या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने नियुक्त केलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा देण्यास नकार देण्यात आला होता. राज्य सरकारने 2020 मधील खरिपाचे 130 आणि रब्बीचे 70 असे 200 कोटी रुपये थकवल्याचा आरोप रिलायन्सकडून करण्यात आला. यानंतर या 10 जिल्ह्यात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.
रिलायन्सकडे 10 जिल्ह्यातील तब्बल 17 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. शिवाय नुकसानीच्या ऑनलाईन ऑफलाईन तक्रारीही केल्या होत्या. मात्र चार महिन्यांनंतरही कंपनी पैसे देत नसल्याने पहिल्यांदा या 10 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे कंपनीची तक्रार केली. त्यानंतर राज्याच्या कृषी आयुक्तांची थेट केंद्राकडेचे रिलायन्सची तक्रार केली. एवढं होऊनही कंपनी दाद देत नसल्याने राज्य सरकार विषेशतः कृषी मंत्री दादा भुसे यांनी कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. परभणीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या फिर्यादी वरून रिलायन्सच्या दोन राज्य समन्वयकांवर गुन्हे दाखल झाले. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात चांगलेच रान पेटवले अन रिलायन्स या दबावापुढे झुकावे लागले.
दोन दिवसापूर्वी रिलायन्स कंपनीने 430 कोटींची पीक विमा रक्कम मंजूर केलीय. शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 15600 रुपये जमा करण्यास सुरुवात केलीय. परभणी जिल्ह्यातील 29 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे पडले असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या आठ दिवसात विमा रक्कम जमा होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्यामुळे देर आये दुरुस्त आये म्हणत विम्याचे पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे.
संबधित बातम्या :
परभणी जिल्हा परिषदेने केला रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव
रिलायन्समुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष, कंपनी विरोधात राज्याची केंद्राकडे तक्रार
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live