शरद पवारांनी आडनाव बदलून आगलावे ठेवावे; सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका
Sadabhau Khot on Sharad Pawar : आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
Sadabhau Khot on Sharad Pawar : शरद पवारांनी (Sharad Pawar) आयुष्यभर काड्या लावायचे काम केले, त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे, अशी बोचरी टीका रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot criticized Sharad Pawar) यांनी केली. सांगली येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाबाबतबोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.
शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले, त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे. उभं आयुष्य त्यांचं आग लावण्यात गेलं, त्यामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला, ते कुठतरी आतां थांबलं पाहिजे असं म्हणाताना सदाभाऊ खोत यांनी एका घरात आग लावायची तिथलं झालं की दुसऱ्या घरात आग लावायला जायचं काम शरद पवार करतात असल्याची शेलकी टीका केली.
सांगलीतल्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकाच्या वादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या स्मारकाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. याबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली.
मातोश्रीच्या उपकारांची परतफेड लिहून ठेवली
सदाभाऊ खोत यांनी शिवसेना नगरसेवक, मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाला सापडलेल्या डायरीबाबत ही खोत यांनी टीका केली. प्रत्येकाला आपली मातोश्री प्रिय असते, श्रद्धास्थान असते. मात्र, आपल्या आईसाठी आपण जे करतो ते कुठेही लिहून ठेवले जात नाही. पण अलीकडं नामकरण झालेल्या मातोश्रींच्या उपकारांची परतफेड केल्यानंतर लिहून ठेवले जात असल्याचे त्यांनी म्हटले. आई ही वसुली अधिकारी नसते, आई ही प्रेमाचा सागर असते मात्रं जिथं वसुली होते तिथं मात्र लिहून ठेवले जाते असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकरी वीज तोडणीवर आक्रमक
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवर सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली. आता जर तुम्ही वीज तोडायला आलात तर शेतकऱ्याच्या हातात दांडके असतील आणि तुम्हाला सोलून काढलं जाईल असा गर्भित इशारा सदाभाऊ खोत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. हे सरकार लुटारू असून यांना वसुली शिवाय दुसरं काहीच येत नसल्याचीही टीका खोत यांनी केली.