Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, आईने 10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
Mumbai Murder: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे परिसरात मानसिक आजार असलेल्या आईने आपल्या पोटच्या मुलाला वायरने गळा आवळून ठार मारल्याची घटना घडली आहे.
मुंबई: मुंबईच्या वांद्रे परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाला ठार मारल्याची घटना घडली आहे. मुंबई उपनगरातील वांद्रे परिसरात गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. खेरवाडीच्या वाय कॉलनीत राहणाऱ्या अभिलाषा औटी (वय 36) यांनी त्यांचा मुलगा सर्वेश (वय 10) याला ठार मारले. अभिलाषा औटी याला स्क्रिझोफेनिया हा आजार होता. या आजाराचा रुग्ण अतिआक्रमक किंवा अतिप्रेमळ वागतो. याच भरात अभिलाषा यांनी टोकाचे पाऊल उचलत लहानग्या सर्वेशचा गळा वायरने आवळला आणि त्याला ठार मारले. या घटनेमुळे खेरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Murder News)
औटी कुटुंबीय हे वांद्रे पूर्वेला असणाऱ्या खेरवाडी परिसरातील वाय कॉलनीत राहत होते. सर्वेशचे वडील हे उप-सचिव पदी कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी अभिलाषा आणि त्यांचा मुलगा सर्वेश हे दोघेच घरात होते. अभिलाषा यांना स्क्रिझोफेनिया आजार असल्याने त्यांची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. गुरुवारी काही कारणामुळे अभिलाषा यांना राग आला आणि त्यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. त्यांनी रागाच्या भरात सर्वेशला खेचत बेडरुममध्ये नेले. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा लावून घेतला आणि एका वायरने सर्वेशचा गळा आवळला. या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी सर्वेशचे वडील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. अभिलाषा यांचे पती हे सरकारी कर्मचारी असून उप-सचिव पदी कार्यरत असून सदर घटनेने फरच खचून गेले असल्याची महिती पोलिसांनी दिली. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे खेरवाडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्क्रिझोफेनिया आजार नेमका काय असतो?
स्क्रिझोफेनिया हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या आजाराच्या रुग्णांना वेगवेगळे भास होणे, बुद्धीभ्रंश आणि मनात विसंगत विचार येणे, असा त्रास जाणवतो. त्यामुळे या व्यक्तींचे वागणे सामान्य नसते. या आजाराच्या रुग्णांना दैनंदिन व्यवहारातील गोष्टी करणेही अवघड असते.
आणखी वाचा
शालेय साहित्य घ्यायला पैसे नाहीत, मुलाची आत्महत्या, पाठोपाठ कर्जबाजारी शेतकरी बापानंही जीवन संपवलं