(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravi Rana : रवी राणांचा मुहूर्त ठरला, 23 एप्रिलला 'मातोश्री' समोर हनुमान चालिसा पठण करणार
आमदार रवी राणा यांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद वाढणार हे स्पष्ट झालं आहे.
अमरावती: आमदार रवी राणा 23 एप्रिलला 'मातोश्री' निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यांच्यासोबात 600 हून अधिक कार्यकर्ते हे मातोश्रीसमोर जमणार आहेत. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण केलं नाही तर आपण मातोश्रीसमोर जाऊन पठण करू असं आव्हान आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. रवी राणांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष शिगेगा पोहोचण्याची शक्यता आहे.
या आधी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने मातोश्रीसमोर गर्दी केली होती. पण राणा दाम्पत्य काही आले नाहीत. आता आमदार रवी राणांचा मातोश्री समोरील हनुमान चालिसा पठणाचा मुहूर्त ठरला असून 23 एप्रिल रोजी ते मुंबईत येणार आहेत.
आमदार रवी राणा म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागलं आहे. त्यामुळे हनुमान जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा पठण करावं असं आवाहन आपण केलं होतं. पण त्यांनी ते केलं नाही. त्यामुळे आता आम्ही 23 एप्रिलला हनुमान चालिसाचे पठण हे मातोश्रीसमोर करणार आहे. हे पठण अत्यंत शांततापूर्वक करण्यात येणार असून एखाद्या वारीप्रमाणे केलं जाईल. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हनुमान चालिसाला विरोध का करत आहेत हे समजत नाही."
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर शिवसेनेने राणांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केलं होतं. राणा दाम्पत्यांने या आधीही सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: