NIA Raids On PFI : पॉप्युलर फ्रंटच्या कार्यालयांवर राज्यभर छापेमारी, टेरर फंडिंग प्रकरणी अनेकांना अटक
Popular Front Of India : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या विविध शहरांतील कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली असून या प्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई: वादग्रस्त संघटना पीएफआय ( PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना तपास यंत्रणा एनआयएच्या रडारवर आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तब्बल 20 ठिकाणांवर एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई सुरु केली आहे. राज्यातल्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएनं एटीएसच्या मदतीनं पीएफआयच्या कार्यालयावर छापे मारले आहेत. त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. तर देशभरातून आतापर्यंत एकूण 45 जणांना ताब्यात घेतलं आहे.
नवी मुंबईच्या नेरुळमध्येही रात्री तीन वाजल्यापासून NIA ची छापेमारी सुरु आहे. सेक्टर 23 मधल्या PFI च्या कार्यालयावर NIA ने छापा टाकलाय. प्यॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मराठवाड्यात नऊ जणांना अटक
एटीएस आणि एनआयएकडून आज पहाटे राज्यातील 20 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये एनआयएने कारवाई करत नऊ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये औरंगाबादमधून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर नांदेडमधून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील मुख्य कार्यालयावर छापेमारी, दोघांना अटक
एनआयए आणि एटीएसने कारवाई करत पुण्यातील कोंढवा भागातील मुख्य कार्यालयावर छापे टाकले आहेत. यावेळी काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्यांबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच पुण्यातून कयूम शेख आणि रजी अहमद खान या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
कोल्हापूरमध्ये एकाला अटक
कोल्हापूरमध्येही कारवाई करण्यात आली आहे. पीएफआयचा पदाधिकारी असल्याच्या संशयातून जवाहरनगरमधून एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मालेगावात छापेमारी
मालेगावमधील हुडको कॉलनी परिसरातील एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून काही महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. संशियताला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
देशातील 15 राज्यांतील 93 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून त्यामध्ये 45 लोकांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटक, तमिलनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, आसाम, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि मणिपूर या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली.