Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तपासात अनेक धक्कादायक माहितीही समोर येत आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात अद्याप महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. बाबा सिद्दीकींच्या (Baba Siddique) हत्या प्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी मोठी शक्कल लढवली होती. त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपी आकाशदीप गीलने मजुरांच्या हॉटस्पॉटचा वापर करून मास्टरमाईंड अनमोल बिश्नोईशी संवाद साधल्याचं तपासात उघड झालं आहे. पंजाबमधील फाजिल्का येथून अटक करण्यात आलेल्या आरोपी आकाशदीप गिलने त्याच्या शेतात काम करणाऱ्या एका मजुराच्या फोनमधील हॉटस्पॉटचा वापर करून मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई, सहकारी शुभम लोणकर आणि जीशान अख्तर तसेच शूटर शिवा कुमार गौतम यांच्याशी संवाद साधल्याचे तपासात समोर आले आहे.
बलविंदर नावाच्या या मजुराने गुन्हे शाखेला आपला स्टेटमेंट दिले असून, इंटरनेट कॉलसाठी त्याचा हॉटस्पॉट वापरल्याची पुष्टी केली आहे. गुन्हे शाखेला त्याचा शोध लागू नये म्हणून आरोपीने मजुराचे हॉटस्पॉट वापरल्याची माहिती आहे. क्राइम ब्रँच सध्या गिलच्या मोबाईलचा शोध घेत आहे. आकाशदीप गिल याने हत्येसाठी लॉजिस्टिक पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आकाशदीप गिलचा आणि मजूर बलबिंदरचा जबाबही नोंदवला आहे. मुंबई क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाशदीपने चौकशीदरम्यान याची कबुलीही दिली आहे. मुंबई क्राइम ब्रँच आकाशदीपकडे असलेल्या मोबाईल फोनचा शोध घेत आहेत, त्याच्या फोनमधून त्यांना अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकते.
शुटरशी बोलण्यासाठी आखली होती योजना
मुंबई क्राईम ब्रँचच्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील आरोपी आकाशदीप हा समन्वयक म्हणून काम करत होता आणि रसद पुरवत होता. अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर आणि जीशान अख्तर यांच्याकडून मिळालेल्या सूचना आणि नेमबाजांकडून मिळालेली माहिती तो तिघांनाही पोहोचवत होता. चौकशीदरम्यान आणि फोनची तपासणी केल्यानंतर आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवून सुरू चालू होता संपर्क
पोलिसांना सापडू नये यासाठी तो प्रथम आपला मोबाइल फ्लाइट मोडमध्ये ठेवत होता आणि नंतर मजूर बलबिंदरच्या हॉटस्पॉटशी कनेक्ट करून संपर्क साधत होता. हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेटशी कनेक्ट झाल्यानंतर तो अनमोल, शुभम आणि जीशान यांच्याशी बोलायचा आणि त्यानंतर नेमबाज गौतमला त्यांच्या सूचना त्याच पद्धतीने पोहोचवायचा. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आकाशदीप गिलला बिश्नोई टोळीने पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.