Video : धक्कादायक: पुस्तकाचं नाव माहित नसतानाही संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
ज्या पुस्तकावर आक्षेप घेऊन कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली त्या पुस्तकाचे नावच कार्यकर्त्यांना माहिती नसल्याचे पुढे आले आहे.
Girish Kuber : नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, आता या प्रकरणातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या पुस्तकावर आक्षेप घेऊन कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली त्या पुस्तकाचे नावच कार्यकर्त्यांना माहिती नाही. एबीपी माझाला प्रतिक्रीया देताना, "तुम्ही ज्या पुस्तकावर आक्षेप घेत कुबेर यांच्यावर शाई फेक केली त्या पुस्तकाचे नाव सांगा, असा प्रश्न नितीन रोटे पाटील यांना विचारला असता त्यांना पुस्तकाचे नावच सांगता आले नाही.
गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे साहित्य संमेलनात मोठी खळबळ उडाली. सकाळीच साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यांनी संमेलन परिसरात फेरफटका मारत साहित्यिकांशी देखील संवाद साधला होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी त्यांच स्वागत केलं होतं. मात्र, संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्यामुळे गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
शाई फेक करण्यात आल्यानंतर नितीन रोटे पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचे कारण सांगितले. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी आक्षेपाहार्य लिखाण केल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी तुम्ही कोणत्या पुस्तकाबद्दल बोलत आहात? असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला परंतु, त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. फोन सुरूच असताना ते आजूबाजूला पुस्तकाचे नाव विचारू लागले. पण तेथे कोणालाच पुस्तकाचे नाव सांगता आले नाही. त्यामुळे त्यांनी कोणाला तरी फोन करून पुस्तकाचे नाव विचारले. त्यावेळी समोरून पुस्तकाचे नाव सांगण्यात आले परंतु, समोरून सांगितलेले नावही पाटील यांना सांगता आले नाही. तरीही ते शाई फेकण्यात आल्याची गोष्ट अभिमानाने सांगत होते.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.
Girish Kuber : पुस्तकाचं नाव माहित नसतानाही संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक ABP Majha : पाहा व्हिडिओ
संबंधित बातम्या
साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेकीचा संजय राऊतांकडून निषेध, म्हणाले...
...म्हणून मराठी समाजाने कितीही अभिमान बाळगला तरी तो कमीच : जावेद अख्तर