(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोलीस भरतीच्या 2 लाख उमेदवारांची व्यथा, मनोज जरागेंना मंत्र्यांचा फोन; शंभूराज देसाईंकडून आश्वासन
पोलीस भरतीमधील वयवाढीबाबत मराठा तरुणांनी मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरुन मंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली.
मुंबई : राज्यात उद्यापासून 17 हजार 471 जागांसाठी पोलिस भरती (Police Recruitment) सुरू होत असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. अगदी डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले उमेदवारही स्पर्धेत आहेत. मात्र, ही भरतीप्रक्रिया जनी 2022-23 ची असून दीड ते 2 वर्षे उशिराने जाहिरात निघाली आहे. त्यामुळे, सुमारे 2 ते 3 लाख उमेदवार एजबार झाले आहेत. त्यामुळे, त्यांना या भरतीप्रक्रियेत अर्ज करता येत नाही. त्याच, अनुषंगाने या उमेदवारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, उत्पादन शुल्क मंत्री शुभराजे देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यावर, मंत्री महोदयांकडून आश्वासन देण्यात आलं आहे.
पोलीस भरतीमधील वयवाढीबाबत मराठा तरुणांनी मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरुन मंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली. त्यावेळी, विद्यमान पोलीस भरती 2022-23 ची भरती आता काढलेली आहे. त्यामुळे, अनेक मुलांची वयोमर्यादा ओलांडल्याने अनेक उमेदवारांचं नुकसान होतं असल्याची व्यथा मुलांनी शंभूराज देसाई यांच्याकडे मांडली. आम्हाला फक्त आश्वासन दिलं जात आहे, पण भरतीप्रकिया सुरू होत असल्याने उमेदवारांनी नाराजी दर्शवली आहे. आम्ही 2022-23 च्या भरती प्रक्रियेनुसार वयोमर्यादेत बसतो. सुमारेदोन ते अडीच लाख विद्यार्थी वयोमर्यादेमुळे बाद ठरत आहेत. त्यामुळे, आम्हाला भरती प्रक्रियेत समाविष्ठ करुन घेण्याची मागणी या उमेदवारांनी केली आहे.
शंभूराज देसाईंचं आश्वासन
दरम्यान, मुलांचे म्हणणे ऐकून शंभूराज देसाईं यांनी पोलीस भरतीसंदर्भाने मनोज जरांगे यांना फोन केला. त्यावेळी, संबधित विषय माझ्याकडे येत नाही, तो गृहमंत्री यांच्या खात्याचा विषय आहे. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या बाहेर आहेत, पण त्यांना भेटून याबाबत काय करता येतं ते पाहतो, असे आश्वानस शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना दिले. तसेच, मुलांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ, असेही देसाई यांनी म्हटले आहे.
1 जागेसाठी 781 उमेदवार स्पर्धेत
राज्यात पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी मेगा भरती होत आहे. त्यातील बँडसमन म्हणजेच पोलिसांच्या बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे दिसत आहे. या पदासाठी 41 जागा आहेत. त्यासाठी 32 हजार 26 अर्ज आले आहेत.या पदाच्या एका जागेमागे 781 उमेदवार स्पर्धेत आहेत. राज्यातील पोलिस भरती बुधवारपासून सुरू होत असून सुरूवातीला मैदानी चाचणी नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे.
भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार
राज्यात पावसाचे प्रमाण लक्षात घेता, भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस आल्यास, भरती प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात येईल. तसेच, एका पदासाठी दोन अर्ज हे उमेदवारांना करता येणार नाहीत. मात्र विविध पदांसाठी अर्ज केले असल्यास व एकाचवेळी दोन्ही ठिकाणी तारीख मिळाल्यास ती तारीख उमेदवारांना बदलून दिली जाणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार असून एजंटच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता, पैशांचे व्यवहार न करण्याचे आवाहन अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी केले आहे.
कोणत्या पदासाठी किती जागा
पोलिस शिपाई - ९ हजार ५९५ पद असून ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आलेले आहेत
चालक पदासाठी - १ हजार ६८६ पदांसाठी, १ लाख ९८ हजार ३०० अर्ज आलेत
बँड्समन - ४१ पद असून ३२ हजार २६ अर्ज आलेले आहेत
एसआरपीएफ - ४ हजार ३४९ जागा असून ३ लाख ५० हजार ५९२ अर्ज आलेले आहेत
तुरुंग शिपाई - १ हजार ८०० पदांसाठी ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज आलेले आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI