(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange: मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात, काही तासातच पोहचणार मुंबईच्या वेशीवर
आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. लवकरच मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे. जरांगेंच्या (Manoj Jarange) आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत.. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलीये. त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत. मराठा बांधवाची गर्दी पाहता आज पावणे सात वाजता मराठा मोर्चा लोणावळ्यात पोहचणार आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याने जरांगेंनी आंदोलन थांबवावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी (CM Eknath Shinde) केलंय.
मराठा बांधव माझ्यासाठी गेले अनेक तास रस्त्यावर थांबले आहेत यांना भेटल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. हे लोकच माझी ताकत आहे. आतापर्यंत माझ्यासोबत या मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत. मोजता येणार नाहीत अशा पद्धतीने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत.26 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार आहे. आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे. आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेला नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. मनोज जरांगेंच्या मोर्चाविरोधात सदावर्तेंनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली .हायकोर्टाने जरांगेंना नोटीसही बजावली आहे.
मुंबईत धडकणार, वादळ घोंगावणार
मुंबईत पोहोचेपर्यंत तीन कोटी लोक सहभागी होण्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रॅक्टर, इतर वाहनं आल्यास अडचणीची धास्ती आहे.26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे. मुंबईत लोकल, वाहतुकीवर परिणामांची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्था, सामाजिक शांतता भंगण्याची भीती आहे. महत्त्वाचं म्हणजे, हेच मुद्दे उपस्थित करत गुणरत्न सदावर्तेंनी कोर्टाचं दार ठोठावलं.. यावेळी कोर्टाने कायदा आणि सुव्यस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, अशी टिप्पणी करत जरांगेंना नोटीस बजावली आहे.
मुंबापुरीची धावपळ जरांगेंच्या आंदोलनामुळे थबकणार
एकीकडे सरकारकडून जरांगेंशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे सरकारचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी मात्र जरांगेवर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. जरांगेंच्या वाटेवर सरकार वाटाघाटी करतंय आणि सोबतच कोर्टात जरांगेंवर कारवाईचे संकेतही देतंय. त्यामुळे, ज्या वेगाने मनोज जरांगे लाखो लोकांना घेऊन मुंबईकडे झेपावतायत, तितक्याच वेगाने सरकारचीही धावपळ सुरू झालीय.म्हणूनच, घड्याळाच्या काट्यांना आणि कॅलेंडरच्या आकड्यांना टांगलेल्या मुंबापुरीची धावपळ जरांगेंच्या आंदोलनामुळे थबकते की त्याआधीच सरकार तोडग्याची वेळ साधतंय, हेच पाहणं महत्त्वाचं आहे.
हे ही वाचा :