(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain Update : अरेच्चा, हा तर हिवसाळा! मुंबईसह उपनगरांत पावसाची हजेरी, राज्यभरातही हलक्या सरी
Maharashtra Monsoon Update : ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये देखील वरुणराज बरसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता डिसेंबरच्या सुरुवातीलाही पावसानं हजेरी लावली आहे.
Maharashtra Monsoon Update : ऐन हिवाळ्यात पावसानं हजेरी लावल्यामुळं राज्यभरात दाणादाण उडाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.
हवामान विभागाकडून राज्यभरात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारसाठी आज ऑरेंज अलर्ट या भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील विविध भागांत दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस अनुभवायला मिळणार आहे.
मुंबईतील किमान सरासरी तापमान 23.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग अधिक असल्यानं मच्छिमारांना आज आणि उद्या समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी भागात आज वाऱ्यांचा वेग अधिक असणार तर उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उद्या वाऱ्यांची तीव्रता वाढणार आहे.
ऑक्टोबरमध्ये हिट आणि पावसाळा अनुभवल्यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील वरुणराज बरसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्यानं आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. तिकडे विदर्भात मात्र थंडीने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आलं आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये गारवा निर्माण झाला आहे.
30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावआणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो.
कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस
कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यातआला आहे. ज्यात मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबादसारख्या जिल्ह्यांनादेखील 1 आणि 2 डिसेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ह्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा