Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर दौरा रद् झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
Maharashtra NCP Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. कधी काय होईल याचा नेम लावणंही अशक्य झालं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण राष्ट्रवादीसोबतच शिवसेनेतही वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंगळवारी रात्री उशिरा तडकाफडकी नागपूरहून (Nagpur News) मुंबईला (Mumbai News) परतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांचा आज गडचिरोलीच्या (Gadchiroli) गोंडवाना विद्यापीठात कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मुख्यमंत्री मात्र रात्रीच घाईघाईनं मुंबईला परतले. ते आज पुन्हा नागपूरला परतणार होते, मात्र आता त्यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं काल (मंगळवारी) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नागपुरात (Nagpur News) आगमन झालं. आज सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. नागपूरमध्ये राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील नागपूरात थांबणार होते. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री गडचिरोली आणि नागपूरमध्ये थांबणार होते. मात्र, राष्ट्रपतींचा आजचा मुक्काम असलेल्या राजभवनात त्यांना सोडल्यानंतर मुख्यमंत्री तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांचं येणं शिंदे गटातील बऱ्याच आमदारांच्या पचनी पडलेलं नाही, असंही बोललं जात आहे. तसेच, अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या इतर आमदारांमुळे जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात, असं शिंदे गटाच्या आमदारांचं म्हणणं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच काही दिवसांतच शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊन अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी केले आहेत. त्यामुळे शिंदेंचं तडकाफडकी मुंबईला येणं आणि त्यानंतर राष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर असूनही दौरा रद्द करणं यांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नागपूर दौरा नेमका का रद्द केला? याचं उत्तर कदाचित येणारा काळच सांगेल.